Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूची सवय सोडायची? हे 4 उपाय

 दारूची सवय सोडायची? हे 4 उपाय


मुंबई, 24 डिसेंबर : दारू पिणं  हा आजच्या आधुनिक जीवनशैलीचा  महत्त्वाचा भाग झाला आहे. अनेकदा वेळप्रसंगी घेतली जाणारी दारू दररोजची आवश्यक गोष्ट कधी होऊन जाते, हे अनेकांना कळत नाही.

दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे माहीत असूनही अनेकांना दारू पिण्याचं व्यसन जडतं. याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ लागतो. अशा वेळी दारू सोडण्याचा प्रयत्न केला जातो; पण अनेकांना त्यात यश येत नाही. कारण यासाठी आवश्यक असतो तो दृढनिश्चय  कमी पडतो.

अशा परिस्थितीत ज्यांना खरंच दारू सोडायची आहे, अशा व्यक्तींसाठी अमेरिकेतल्या टेक्सास इथल्या ड्रिफ्टवुड रिकव्हरी या मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्राने चार प्रभावी उपाय सुचवले आहेत. तुमची दिनचर्या, सवयी बदला : दारू पिणं हा अनेकांच्या दिनचर्येचा  भाग बनलेला असतो. दररोज रात्री जेवणानंतर, टीव्ही पाहताना किंवा बुद्धीबळ, पत्ते असे खेळ खेळताना दारू पिण्याची सवय अनेकांना असते. ही सवय बदलावी लागेल.

यासाठी टीव्ही पाहताना अल्कोहोलिक ड्रिंकऐवजी नॉन-अल्कोहोलिक बिअर वापरू शकता. रात्रीच्या जेवणानंतर दारूऐवजी आयुर्वेदिक चहा पिण्याचा प्रयोग करू शकता. म्हणजे हातात ग्लास असावा; पण तो दारूचा नाही तर अन्य पेयाचा. स्वतःला वचन द्या : एखादी गोष्ट तडीला न्यायची असेल तर त्यासाठी दृढनिश्चय करणं महत्त्वाचं असतं.


तरच ती गोष्ट पूर्णत्वाला जाऊ शकते. दारू सोडण्याची बाबही याच दृढनिश्चयाने पूर्णत्वाला नेता येणं शक्य आहे. त्यामुळे दारू सोडण्याची मनापासून इच्छा असेल तर तसा निश्चय करा आणि त्यासाठी प्रयत्न सुरू करण्यापूर्वी स्वत:ला एक वचन  द्या. हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे.

ज्याप्रमाणे अनेक व्यक्ती मिठाई न खाणं, नियमित योगासनं करणं, फिरणं, जंक फूड न खाणं यासाठी एक कालावधी निश्चित करून त्या कालावधीत ती गोष्ट न चुकता साध्य करतात. त्याच प्रकारे, एक संपूर्ण आठवडा दारू पिणार नाही किंवा प्रमाण कमी करणार अशी अट स्वतःसाठी घालून घ्या आणि त्याची पूर्तता करा. स्वत:ला दिलेलं हे वचन आठवडाभर अंमलात आणा. त्याचा नक्कीच फायदा होईल.

अशा प्रकारची वचनबद्धता हा सवयी बदलण्याचा एक प्रभावी मार्ग असल्याचं अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे. सोशल सपोर्ट घ्या : मद्यपानाची सवय सोडायची किंवा कमी करायची असल्यास ही इच्छा तुमच्या जवळच्या व्यक्तीला  सांगा. जवळचा मित्र, जीवनसाथी किंवा कुटुंबातला सदस्य अशा तुमच्या जवळच्या व्यक्तीला याची कल्पना द्या. यामुळे तुमच्यातली जबाबदारीची भावनाही वाढेल.

आपली तीव्र इच्छा दाबून टाकण्यामुळे निर्माण होणाऱ्या तणावाला सामोरं जाण्यासही यामुळे मदत होईल. दारू पिण्याची इच्छा झाली तर आपल्या जवळच्या व्यक्तींसह फिरायला किंवा काही मनोरंजनासाठी बाहेर जा. यामुळे मन दुसऱ्या गोष्टीत गुंतेल आणि दारू पिण्याची इच्छा कमी होईल. अडथळे निर्माण करणं : दारू पिण्यासाठी काही नियम  बनवा.


उदाहरणार्थ, दारू पिण्यासाठी ठराविक वेळ, कालावधी ठरवा. जसं की, 45 ते 60 मिनिटं घाई न करता एक ग्लास वाइन पिणं. अल्कोहोलमुळे शरीरातलं पाणी कमी होत असल्याने, दारू प्याल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याची शिफारस डॉक्टरांकडून केली जाते. त्यामुळेही दारू कमी घेतली जाऊ शकते. अशा काही नियमांमुळे दारू पिणं कमी होण्यास मदत होईल. या उपायांमुळे दारू पिण्याच्या व्यसनातून सुटका करून घेण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.