अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत 1797 प्रकरणात 11 कोटीहून अधिक व्याज परतावा
सांगली, दि. 23, : आर्थिक मागास घटकांच्या विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कामकाज करीत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच गट प्रकल्प कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांच्या माध्यमातून 10 ते 50 लाखापर्यंत लाभार्थ्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विविध योजनेंतर्गत आत्तापर्यंत 1 हजार 797 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून 11 कोटी 7 लाख 89 हजार 783 रूपये इतका व्याज परतावा करण्यात आला आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 1 हजार 788 मंजूर प्रकरणात 136 कोटी 22 लाख 98 हजार 681 रूपये इतकी रक्कम बँकांनी वितरीत केली. यामधील 1 हजार 474 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालेला असून आत्तापर्यंत 10 कोटी 95 लाख 76 हजार 224 रूपये रक्कमेचा व्याज परतावा करण्यात आला आहे. तर गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 9 मंजूर प्रकरणामध्ये 8 गटांना व्याज परतावा सुरू झालेला असून आत्तापर्यंत 12 लाख 13 हजार 539 रूपये रक्कमेचा व्याज परतावा करण्यात आला आहे.
वैयक्तीक कर्ज परतावा योजनेंतर्गत पुरूष लाभार्थ्यांकरीता वय मर्यादा कमाल 50 वर्षे तर महिला लाभर्थ्याकरीता कमाल 55 वर्षे करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील (रक्त नाते संबंधातील) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरी देत आहे. गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत यापुर्वी किमान पाच व्यक्तींच्या गटाला किमान 10 लाख रूपये ते कमाल 50 लाखाच्या मर्यादेत कर्जावरील व्याज परतावा करण्यात येत होता. या योजनेमध्ये शिथिलता आणून दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लाख रूपयेच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी कमाल 35 लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी कमाल 45 लाखाच्या मर्यादेवर तर पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखाच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेती पूरक व्यवसाय करणाऱ्यांना व महिला बचत गटाकरिता असलेली कमाल वयोमर्यादेतची अट वगळण्यात आली आहे. गट प्रकल्प कर्ज योजनेंतर्गत F.P.O. गटांची संख्या २० पेक्षा जास्त असल्यास संबंधित गटाच्या संचालकाने सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचे पुरावे यापूर्वी अपलोड करणे अनिवार्य आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.