100 रुपयांनी महाग झाला गॅस सिलेंडर
नवी दिल्ली : कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे आधीच हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कमर्शिअल सिलेंडरच्या दरात एक डिसेंबरपासून तब्बल 100 रुपयांची वाढ झाली आहे. कमर्शिअल सिलेंडरच्या दरात गेल्या महिन्यात ऐन दिवाळीत 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच दोन महिन्याच्या आत कमर्शिअल गॅसच्या किंमतीमध्ये 366 रुपयांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे.
इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. एलपीजी सिलेंडरचे दर कमी करावे की त्यात वाढ करावी याबाबत या आढाव्यात निर्णय घेतला जातो. प्रत्येक कंपनीकडून बैठकीनंतर दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात. काही वेळेस दर कायम ठेवले जातात. पण, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
आज वाढवण्यात आलेल्या कमर्शिअल गॅसच्या किंमतीनंतर महागाईचा भडका उडाला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलेंडरची किंमत राजधानी दिल्लीमध्ये 2101 रुपये एवढी झाली आहे. 1950 रुपयांना मुंबईमध्ये मिळणारा कमर्शिअल सिलेंडर आता 2051 रुपयांना मिळेल. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलिंडर 2177 रुपयांना झाला आहे. चेन्नईमध्ये कमर्शिअल गॅसची किंमत देशात सर्वाधिक आहे. चेन्नईमध्ये 19 किलो वजनाचा सिलेंडर घेण्यासाठी 2234 रुपये मोजावे लागतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.