Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Jio, Airtel आणि Idea-Vodafone ने आपले प्रीपेड दर का वाढवले?

 Jio, Airtel आणि Idea-Vodafone ने आपले प्रीपेड दर का वाढवले?


एअरटेल, जिओ आणि आयडिया-व्होडाफोन या तीनही प्रमुख टेलिफोन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपले प्रीपेड सेवेसाठीचे दर जवळजवळ 19% ते 25% नी वाढवले आहेत. एक डिसेंबरपासून हे नवे दर लागू होतील. जिओनं आपला 28 दिवसांसाठी असलेला प्राथमिक प्लान आधीसारखाच 91 रुपये इतका ठेवला आहे. तर एअरटेलने हा प्लानही बदलून 28 दिवसांसाठी 99 रुपये इतका केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आयडिया-व्होडाफोन कंपनीही आपले नवे दर लागू करण्याची शक्यता आहे.टेलिकॉम क्षेत्रात या नवीन प्रीपेड दरांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये प्रश्न आहेत की हे दर का वाढले?

प्री-पेड नंतर पोस्ट पेड सेवेवरही याचा परिणाम होणार का? आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेत याचा काय परिणाम होईल. या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया.

प्री-पेड मोबाईल दर का वाढले?

भारतात मोबाईल प्राईस-वॉर म्हणजेच स्वस्त मोबाईल आणि इंटरनेट सेवा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये मागचे पाच वर्षं एक अघोषित युद्ध सुरू होतं. कारण, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि आयडिया व्होडाफोन या कंपन्यांमध्ये ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सुरू असलेली जोरदार स्पर्धा. 2016मध्ये रिलायन्स जिओचं या स्पर्धेत आगमन झालं होतं. आणि तिथून ग्राहकांना अतिरिक्त सुविधा, स्वस्त हँडसेट आणि इतर सवलती देण्याची स्पर्धा प्रचंड वाढली. पण, यात भारतीय ग्राहकांचा फायदा होत होता तसंच माहिती-तंत्रज्ञान सेवा देऊ करणाऱ्या कंपन्यांचाही. त्यांचा उद्योगही वाढत होता.पण, असा स्वस्त टॉकटाईम आणि डेटा ग्राहकांना देण्याच्या नादात या टेलिकॉम कंपन्यांचं मात्र नुकसान होत होतं. 

टेलिकॉम क्षेत्रात 'अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर' या संकल्पनेला महत्त्व आहे. दर ग्राहकामागे कंपनीला मिळणारा महसूल. हा आकडा कंपनीची कामगिरी आणि नफा कमावण्याची क्षमता समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. अलीकडच्या प्राईस वॉरमुळे तीनही प्रमुख भारतीय कंपन्यांचा हा दर दोनशेच्याही खाली गेला होता. याचा थेट अर्थ कंपन्यांचा नफा दिवसेंदिवस कमी होत होता. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे हा दर साधारणत: 300च्या आसपास असतो. दर वाढले तर टेलिकॉम कंपन्यांचा महसूल वाढेल आणि चांगलं नेटवर्क, ते वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तसंच आगामी 5-जी सेवा ग्राहकांना देण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक यासाठी हा पैसा टेलिकॉम कंपन्या वापरू शकतील. त्यामुळे वाढील दरांचा बोजा ग्राहकांवर पडणार असला तरी कदाचित आतापेक्षा चांगली सेवा मिळू शकेल. एअरटेल कंपनीने मागच्या आठवड्यात दरवाढीची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली होती ती त्याचसाठी.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.