Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते विटा शहराचा होणार सन्मान

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते विटा शहराचा होणार सन्मान


सांगली, दि. 18,  : स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा शहराने देशामध्ये अव्वल क्रमांक पटकवला असून दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सन्मान होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा शहर हे स्वच्छतेच्या शर्यतीत देशामध्ये अव्वल ठरले असून लोणावळा द्वितीय तर सासवड नगरपरिषदेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. विटा शहरासाठी हे यश कौतुकास्पद असून विटा नगरपरिषदेचे नावलौकिक पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण देशामध्ये झाले आहे. यासोबतच विटा शहराने कचरामुक्त शहर व हागणदारी मुक्त शहर ODF ++ आदी नामांकने देखील मिळवली आहेत. 

विटा शहर कचरा कुंडी मुक्त, कचरा मुक्त, प्लास्टिक मुक्त व हागणदारीमुक्त असून विटा शहरातील प्रत्येक नागरिकाला याचा सार्थ अभिमान आहे. स्वच्छ सर्वेक्षण  स्पर्धेमध्ये देशातील 4 हजार 320 शहरांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये विविध घटकांवरती शहराचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये शहर स्वच्छता, रहिवासी व्यापारी व सार्वजनिक भागाची नियमित स्वच्छता, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना व नागरिकांचा सहभाग व जनजागृति, 3R प्रणाली, 100 टक्के कचरा वर्गीकरण, कलेक्शन व प्रोसेसिंग, होम कम्पोस्टिंग, नाले तलाव व्यवस्थापन व स्वच्छता, अशा अनेक स्वच्छताविषयक घटकांचा समावेश केला जातो. हे सर्व घटक शहराच्या सर्वांगीण विकासाला पोषक असून याद्वारे संपूर्ण शहराचा शाश्वत विकास होण्यास मदत होते.

या संपूर्ण सर्वेक्षणमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचे वेळोवेळी विविध विषयांवरती मार्गदर्शन मिळाले. तसेच नगरपरिषदेस भेट देऊन आयोजित व नियोजित विविध उपक्रमांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे. या यशामध्ये विटा शहराच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, स्वच्छतेचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर ॲड. वैभव दादा पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, आरोग्य सभापती दहावीर शितोळे, तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, नपा अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी वृंद, सफाई कर्मचारी यांचे अनमोल असे योगदान आहे. तसेच सर्व सामाजिक संस्था, महिला बचत गट, शाळा महाविद्यालय, सर्व आस्थापना कार्यालये, व्यापारी असोसिएशन व शहरातील सर्व नागरिक आदि सर्वांचे कसोटीचे प्रयत्न आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.