Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वसंतदादांना महाराष्ट्र विसरला! मधुकर भावे

 वसंतदादांना महाराष्ट्र विसरला! मधुकर भावे



आज वसंतदादांची १0४ वी जयंती. वसंतदादांचा जन्म १९१७. यशवंराव चव्हाणांचा जन्म १९१३, वसंतराव नाईकांचा जन्म १९१३, शंकरराव चव्हाण यांचा जन्म १९२0 महाराष्ट्राचे चारही मोठे नेते असे पाठोपाठ होते. यशवंतराव चव्हाणांची जयंती-मयंती... शरद पवारसाहेबांमुळे साजरी होते. वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम पुसदपुरता मर्यादित होतो. शंकररावांचा नांदेडपुरता.. वसंतदादाची जयंती किंवा स्मृतीदिन यशवंत हाप्पे यांच्या निष्ठेमुळे साजरा होतो, दहा माणसं जमत नाहीत. यावर्षी माजी राज्यपाल डी.वाय.दादा आले. विधानसभेचे सचिव भागवत आले. पण दादांना महाराष्ट्र नक्कीच विसरलाय. शहरं विसरली, ग्रामीण भागही विसरला. सत्तेवर असतानाच उदोउदो करावा.. ज्या नेत्यंनी महाराष्ट्र घडवला, त्यांच विस्मरण महाराष्ट्राल खूप लवकर झालं. दादा तर सगळ्यात उपेक्षित, पण सगळ्यात शहाणा माणूस. सातवीपर्यंत शिकलेला. पण या फार न शिकलेल्या माणसालाच लक्षात आलं की,  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली मुलं उच्च शिक्षणाकरीता मुंबई, पुणे, नागपूरात पोहोचू शकत नाहीत. त्यांचे आई-बाप श्रीमंत नाहीत, त्यामुळे त्या मुलांना मणिपालला पाठवता येत नाही. शहरातल्या  महाविद्यलयांच्या सगळ्या जागा शहरी श्रीमंती आई-बापाच्या मुलांनी काबीज केल्या आहेत... दादा अस्वस्थ आहेत. फार न शिकलेला माणूस सत्तेवर आल्यावर एका क्षणात निर्णय घेवून टाकतो. सरकारला ग्रामीण भागात उच्च शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात करता येत नाही... ज्यांना ती करता येते त्यांना ती परवानगी देवून टाका. जागा देवून टाका, सवलती द्या. पण ग्रामीण भागाच्या सर्व जाती-धर्माच्या मुलांना उच्च शिक्षण घेवू द्या... दादांच्या या निर्णयावर टीका झाली. दादा थांबले नाहीत, ज्यांनी टीका केली ते सगळे प्र्र्र्रस्थापित होते, उच्चवर्गीय होते, गरीब जाती-धर्मातली मुलं शिकण्यामध्ये त्यांना काय रस होता? दादांनी माणसं हेरली... तो आपला आहे की विरोधक आहे, बघितल नाही. डॉ.डी.वाय.पाटील, डॉ.पी.डी.पाटील, विश्वनाथ कराड, पतंगराव कदम, जयंतराव भोसले, कमलकिशोर कदम.. भाउसाहेब थोरात... आज ग्रामीण भागात वैद्यकीय, अभियांत्रिकी अत्त्युत्तम दर्जाचे शिक्षण मिळते आहे. त्या संस्था उभी करणारी ही माणसं आहेत. त्यावेळी सगळी टीका झेलून या उभ्या राहीलेल्या शिक्षण संस्थांमधून लाखो मुलं शिकली आहेत. पदवीधर झाली, उच्च पदवीधर झाली... कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय विरोधात मुंबईतील एका प्रतिथयश वृत्तपत्राचा कराडचा प्रतिनिधी तुटून पडला होता. विषय उच्च न्यायालयात गेला. त्यावेळच्या न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांना आठ महिन्यांची मुदत दिली. त्या मुदतीत महाविद्यालय उभं करायचं. दादांनी हिंमत दिली. सात महिन्यात उभं राहीलं. यशवंतराव चव्हाण, दादा दोघेही उद्घाटनाला गेले. आज त्या महाविद्यालयाची कीर्ती जागतिक दर्जाची आहे. संगमनेरचे भाउसाहेब थोरात यांना दादांनी बोलवून जागा दिली आणि आभियांत्रिकी कॉलेज काढायला सांगितलं... आज या देशातल सातव्या क्रमांकाच ते दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. भाउसाहेबांचे चिरंजीव बाळासाहेब थोरात यांनी कृतज्ञतेने त्या शिक्षण परिसरात यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभारला, दादांच भव्य तैलचित्र उभं केलं. पण हे अपवाद. दादांनी हे निर्णय आपल्या मान-सन्मानासाठी केले नाहीत. उद्याचा महाराष्ट्र ते पाहत होते. मणिपालकडे जाणारी मुलं ते पहात होते. आज याच मोल कोणालाच वाटत नाही. दादांच्या या निर्णयाने महाराष्ट्राच्या अठरा पगडजातीतील गरीब समाजाची मुलं शिकली, ही केवढी मोठी गोष्ट आहे.


दादा खरच महाराष्ट्राला समजले नाहीत... स्वातंत्र्य चळवळीत छातीवर गोळी झेललेला हा नेता. नशिबानं वाचलं. पण उजव्या बाजूने छातीतून आरपार गेलेली गोळी पाठीकडून बाहेर गेल्याची जखम शेवटपर्यंत दादांनी राजकीय भांडवल म्हणून कधीही वापरली नाही. ते क्रांतीकारक दादा स्वातंत्र्यानंतर झटकन सांधा बदलून सहकाराचे पुरस्कर्ते झाले. आज कोणाला खरं वाटणार नाही.  दादा १९५२ साली पहिल्या निवडणुकीत आमदार झाले. १९५७ च्या कॉंग्रेस विरोधी लाटेत पश्चिम महाराष्ट्रातून जे पाच लोक निवडुन आले (यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, बॅ.जी.डी.पाटील, शंकरराव बाजीराव पाटील आणि दादा) त्यात सर्वाधिक मतांनी दादा निवडुन आले. पुन्हा १९६२ साली निवडुन आले. सलग १५ वर्षे आमदार होते. पण कधीही ‘मला मंत्री करा’ असे सांगायला ते कोणाकडेही गेलेले नाहीत. १९६७ साली ते प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी आमदारकीच तिकीट घेतलं नाही. बिरनाळे यांना निवडुन आणलं. १९६७ साली देशात ९ राज्यात कॉंग्रेसची सरकारं पराभूत झाली होती(काश्मीर, बंगाल, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, मध्यप्रदेश, तेव्हाचा मद्रास, केरळ) त्यावेळी महाराष्ट्रात दादा प्रदेशाध्यक्ष, वसंतराव नाईक मुख्यमंत्री, कॉंग्रेस आमदारांची संख्या २0२. 

१९७२ साली दादांनी तिकीट घेतलं नाही. सांगलीतून प्रा.पी.बी.पाटील यांना निवडुन आणलं. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, प्रदेशअध्यक्ष दादा, कॉंग्रेस आमदारांची संख्या २२२... शेवटी इंदिरा गांधी यांनी दादांना आदेश दिला. तुम्ही मंत्री झालचं पाहिजे. तेव्हा १५ वर्षे आमदार असलेले दादा १९७२ साली नाईकसाहेबांच्या मंत्रीमंडळात क्रमांक २ चे पाटबंधारे मंत्री झाले, विधानपरिषदेत त्यांना निवडून आणलं गेलं. १९७७ साली चार महिन्याकरीता मुख्यमंत्री झाले. १९८0 ला खासदार झाले, १९८३ पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आले, १९८५ ला पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण आपल्याला न विचारता प्रदेशअध्यक्षाची नियुक्ती दिल्लीनं केली म्हणून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारा हा नेता... 

राजस्थानचे राज्यपाल झाले. पण लोकांमध्ये राहत येत नाही म्हणून राज्यपालपदाचा राजीनामा देवून टाकला, असे नेते आता होतील का?...

न शिकलेल्या माणसाने महाराष्ट्र शहाणा केली. महाराष्ट्राचा सहकार उभा केला. हजारो लोकांना रोजगार त्यामुळे लोकांना मिळाला. कृषीविद्यापीठाची सगळी पुस्तकं एका तागडीत टाकली आणि दुसºया तागडीत दादांची ‘पाणी आडवा- पाणी जिरवा’.. ही घोषणा टाकली तर या घोषणेची तागडी भारी होईल एवढ सोप सूत्र दादांनी दिलं. पण दादा गेल्यावर महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसवाल्यांनी त्या घोषणेचा अर्थ ...‘याला अडवा आणि त्याची जिरवा’ असा घेतला म्हणून आज २२२ वरुन कॉंग्रेस ४४ वर आली.... यशवंतराव, दादा असे नेते आज कॉंग्रेसजवळ नाहीत हीच तर शोकांतिका आहे....

दादा हा असा माणूस होता की, त्यांच्या नावातली ‘दादा’ हाक प्रत्येकाच्या हृदयातून येत होती. आपला माणूस, घरचा माणूस, अस सगळेजण दादांना मानायचे, दादा तसंच वागायचे त्यामुळे दादा जेवताना दरवाजा ढकलून आत जायला कार्यकर्त्याला संकोच वाटत नव्हता आणि दादानांही सामान्य कार्यकर्त्याला ‘ अरे ये, दोन घास खा...’ म्हणायला आनंद वाटत होता. दादा या नावातच सगळा आपलेपणा होता. आज एक अजितदादा सोडले तर.. गावपातळीवर प्रत्येक नेता ‘दादा’ नाव लावायला लागला. पण त्या कोणत्याही ‘दादा’ला ‘दादा’बद्दल मनातली आत्मियता सामान्य माणसाला नाही. अजितदादांच्या ‘दादा’ या नावात थोडा धाक आहे. पण दणकून काम करणारा हा एकटाच दादा आहे.

दादा फार शिकलेले नव्हते. ते सांगायचे मी फार पुस्तक वाचली नाहीत. पण मी माणसं वाचली आणि दादांनी खरच माणसं आतून, बाहेरुन वाचली. कार्यकर्त्यांना मोठ केलं. शिक्षण नसल्याबद्दल त्यांना खंत वाटली. पण त्यांनी आत्मविश्वास कधी गमावला नाही. ते पाटबंधारे मंत्री असताना चाफेकर नावाचे चीफ इंजिनिअर होते. दादा त्यांना एका धरणाबद्दल विचारत होते. चाफेकर सांगत होते, २५ टी.एम.सी पाणी आहे. दादा म्हणाले, ‘टी.एम.सी सांगू नको, किती एकर जमीन भिजेल ते सांग..’ लोकांच्या भाषेत दादा बोलायचे. एकदा विधानसभेत आमदार हशू अडवाणी यांनी जोरात प्रश्न विचारला की, ‘केंद्र सरकार, इतनी बडी राशी देने के बावजूद, राज्य सरकार ये राशी क्यू नही उठा रहा है?’

दादा मुख्यमंत्री, उठले... म्हणाले, ‘ऐसा है.. अंथरुण देख के पाय पसरना मंगता है..’ आमदार केशवराव धोंडगे उभे राहीले. म्हणाले, ‘अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांच उत्तर कोणत्या भाषेत आहे?’. अध्यक्ष उठण्यापूर्वीच दादा उभे राहीले. दादा म्हणाले, ‘केशवराव, तुमच्याकरीता हे मराठीत, आणि हशूभार्इंकरीता हिंदीत..’ मग म्हणाले, ‘हशूभाई आपको समझा ना...’ हशू अडवाणी  बसूनच म्हणाले, ‘हा समझा...’

असे हे दादा. किती गोष्टी सांगू आणि किती नाही... अशी माणसं आता होणार नाहीत. त्यावेळचे सत्ताधारी, त्यावेळचे विरोधक, त्यावेळची महाराष्ट्राची वृत्तपत्र, त्यावेळची पत्रकारिता... सगळंच काही विलक्षण होतं. आजचा मिडीया पाहिला की आणि रोजची वृत्तपत्र... त्यातले आरोप-प्रत्यारोप, ती भाषा, कुठच्या संस्कारातून हे सुरु झालं हे समजत नाही.  पण आजचा महाराष्ट्र यशवंतरावांचा, दादांचा महाराष्ट्र नक्कीच नाही. लोकांचे ढीगभर प्रश्न पडले असताना त्याची चर्चाच होत नाही, नवीन रोजगाराची चर्चा होत नाही, नवीन उद्योग उभे राहत नाहीत. एक नवीन धरण नाही, एक औष्णिक उर्जाकेंंद्र नाही...

महाराष्ट्र होता कुठे आणि चालला कुठे...? हे सगळं आरोप प्रत्यारोपांच घाणेरड राजकारण थांबवणारा आहे कोण? फडणवीसांनी सुरुवात केली, त्यांना सांगायला हवं की, त्यावेळच्या विरोधी पक्षनेत्यांचा अभ्यास करा, सगळे विषय भलतीकडे चाललेत. लोकांचे मुख्य प्रश्न सोडून बाकी सगळे विषय चघळायला मिडीयाला मजा येत आहे, अशावेळी यशवंतराव, वसंतराव, दादा, शंकररराव या चार खांबावर महाराष्ट्र उभा आहे, त्याची आठवण येते. हे सर्व थांबविण्यासाठी पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा. केंद्र सरकार ज्या पध्दतीने ईडी, सीडी, वीडीचा वापर करतेय. राजकीय अचरटपणाचा कडे लोट झालेला आहे. हे सामान्य माणसांच राजकारण नाही. ५0 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र हरवला आहे, काही विषयात संपन्नता आली असेल. पण चारित्र्य गमावलेला महाराष्ट्र हा महाराष्ट्र नाही, काही तरी भलतचं आहे. पेरलं काय होत आणि उगवलं काय?.... अशावेळी दादांची आठवण येते, पण त्यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्राला त्यांची आठवण नाही, याची खंत आहे. एकाही वृत्तपत्रात दादांबद्दल दोन ओळी नाहीत. ३१ आॅक्टोबरला इंदिरा गांधींची पुण्यतिथी झाली. लोकमतचा अपवाद सोडला तर, इंदिराजींची आठवणसुध्दा कोणत्या वृत्तपत्राला नव्हती, आपण भलतीकडे निघालो आहोत का?


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.