Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आठवांत बालपणीच्या

 आठवांत बालपणीच्या


लहानपणी मला केस लांब वाढवायची खूप हौस असायची. आई चापून चोपून तेल लावून घट्ट वेणी बांधायची. ती पूर्ण दिवस विस्कटायची नाही. परंतु लांब केस असल्याने तसेच आठवड्यातून दोन वेळा शिकेकाईने स्वच्छ धुतल्याने भरपूर गुंतवळ निघायची. मग आई ती गुंतवळ फेकून न देता घराच्या बाजूला असणाऱ्या गोठ्याच्या कुडात खुपसून ठेवायची. आम्हाला त्यावेळी ती खूप गंमत वाटायची. पण फुगेवाला किंवा सुया दाभण विकणारी बाई दारात आली की आई ती भलीमोठी गुंतवळ देऊन बऱ्याच वस्तू खरेदी करायची. आम्ही कुतूहलाने आईला विचारायचो, "अगं आई हे लोक आपली गुंतवळ घेऊन काय करतात?" तर आई सांगायची," अगं, ही गुंतवळ बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडते. त्याचे गंगावन किंवा केसावरळ बनवून विकले जाते. नाटकात, सिनेमातल्या नट्या ते गंगावन घालून आपली भूमिका वठवीतात.

                   बरेच पुरुष टकले असतात. त्यांच्यासाठी केसांचा टोप म्हणजेच विग बनवला जातो. शिवाय लग्नप्रसंगी वधूला गंगावन लावून सुंदर केशरचना केली जाते आणि त्यावर फुलांची रचना सजावट केली जाते. त्यामुळे केस फेकून न देता त्याचाही उपयोग करून घेणाऱ्या माझ्या काटकसरी आईचे मला आजही कौतुक वाटते. माझी आईच नव्हे तर पूर्वीच्या सर्वच बायका अशा कितीतरी गोष्टींची, वस्तूंची बचत करून 'टाकाऊपासून टिकाऊ' वस्तू बनवत. आमची उंची वाढली की बाहेर घालायची कपडे तोकडे पडू लागायची. मग ती घरात घातली जायची आणि वापरून फाटलेल्या कपड्यांची गोधडी, वाकळ शिवली जायची. फाटलेल्या कपड्याचा चांगला भाग कात्रीने कापून घेऊन वाकळीला पॅचेस लावले जात. दुपारच्या मोकळ्या वेळेत तिघी चौघी बसून आई, आजीच्या जुन्या साड्या त्या पॅचेसवर पसरून ती वाकळ चारी बाजुने दाभणीने शिवली जाई. ही रजई किंवा वाकळ थंडीच्या दिवसात निराळीच उब द्यायची. त्याची तुलना आजच्या शोरूममधील हजाराच्या दुलईशी होऊच शकत नाही. कारण त्यात आई आजीच्या साड्यांची उब असे आणि त्यांनी मेहनतीने बनवलेल्या या रजईचे अप्रूप असे.

          वाकळ शिवून उरलेल्या कपड्या- मधून चुलीला पोतेरे देण्यासाठी , बाथरूमच्या बाहेर टाकण्यासाठी तसेच चुलीवरचे भांडे उतरण्यासाठी उपयोगी पडे. कधी त्याच कपड्यांच्या नाड्या बनवून पेटिकोट आणि बाबांच्या विजारी साठी वापर होई. आजी डिझाईनच्या कपड्यांचे रुमालही बनवत असे. लहान बाळाला लंगोट ,चड्डी शिवण्यासाठीही ते उपयोगी पडे. म्हणजेच कपड्यांचे पुरेपूर पैसे वसूल होत असत. त्यातून बचतही होई. त्यात जिव्हाळा, ममत्व असल्याने ते हाताळताना वेगळीच भावना जोपासली जाई. त्याकाळी उन्हाळ्यात घराघरांत शेवया, पापड, सांडगे, कुरडया बनवून आणि वाळवून डब्यात भरून वर्षभरासाठी ठेवले जात. त्या काळी हातात इतका पैसा खुळखुळत नसल्याने प्रत्येक गोष्टीत बचतीचा मंत्र दिसे. त्यावेळी रेडिमेड पदार्थाची इतकी रेलचेल नसल्यामुळे घरगुती वस्तूंना आणि अशा पदार्थांना फार चव लागायची. सांडगे बनवून उरलेले पीठ संध्याकाळी कांदा मिरची घालून स्वादिष्ट डांगर बनवले जायचे. तसेच आम्ही लहान असताना कुरवड्या शिजवलेले पीठ साखर घालून   मुलांना वाटीत घेऊन गरम गरम खाण्यात खूप मजा यायची.

                  सणासुदीला कुरडया, पापड तळले जायचे. त्यामुळे त्याचे एक वेगळेच अप्रूप वाटायचे. आई वर्षभरातील आंब्याचे आणि लिंबाचे लोणचे करून बरणीत भरून ठेवत असे. तेव्हा पापड, लोणचे आणि डाळ भात खाण्यात खूप आनंद वाटायचा. त्याकाळी हॉटेल आणि बाहेरच्या खानावळीची इतकी चंगळ नसायची. घरगुती जेवणाला फार महत्त्व दिले जायचे. त्यामुळे असे पक्वान्न असलेले पदार्थ खाण्याची खूप मजा यायची आणि वर्षभर केलेल्या पदार्थांना त्यावेळी चांगलीच चवही असायची. वर्षभराची एकत्र चटणी करण्याचादेखील एक साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. चार चौघी मिळून मिरच्यांचे देठ काढून त्या दुसऱ्या दिवशी भाजून ,गरम मसाला, कांदा ,खोबरे सर्वकाही भाजून, शिजवून ते चटणीच्या डंकावर घेऊन जायचे आणि डंकवाली बाई ते कुटुन आपल्या हातात आणून द्यायची. त्यात देखील खूपच मजा यायची. शिजवलेल्या कांद्याची संध्याकाळी हमखास भाजी व्हायची. त्याची चव आजही जिभेवर रेंगाळत असते. घरगुती पदार्थ खाण्यात जी मजा आहे ती आजच्या लेकरांना मिळत नाही. आज पावभाजी,पिझ्झा, डोसा, बर्गर अशा पदार्थांची जिकडे पहावे तिकडे रेलचेल दिसते. परंतु आम्ही जे पदार्थ लहानपणी  खाल्ले आहेत ते हल्लीच्या मुलांना मिळणे दुरापास्त झाले आहे. आणि त्याची रंगत ही त्यांना कळत नाही. आमच्या जिभेवर रेंगाळणारी चव आजही आम्हाला जाणवत असते आणि तसे बालपण पुन्हा फिरून यावे म्हणून आम्ही  देवाला विनवत असतो. 

          आमच्या घरी शेवया करण्यासाठी चार दिवस मोठे लाकडी पाट ठेवले जात असत. त्यांना मोठ्या डब्यांचा आधार ठेवून त्यावर पाट ठेवून एक जण शेवया वळायची आणि दुसरी जण चाळायची. अशाप्रकारे दिवसभर गप्पांची मैफिल करत कितीतरी किलोच्या शेवया केल्या जात. वर्षभर त्या शेवया दुधाची खीर किंवा तुपात घालून शिजवल्या जायच्या. कोणी खास पाहुणा आला की हमखास शेवयाची खीर केली जायची. उपवासाला चालणारे असे साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे वेफर्स देखील उन्हाळ्याच्या सुट्टीत बनवून डबा भरून वर्षभरासाठी ठेवले जायचे. त्यामुळे वर्षभरात उपवास करणाऱ्यांची चंदी असायची आणि आम्हां मुलांना प्रत्येकाच्या उपवासाच्या वेळी असेच तळलेले पदार्थ खायला मिळायचे.

आमच्या लहानपणी रेडिमेड वस्तू जरी मिळत नसल्या तरी घरातल्या कडधान्याचे असे निरनिराळे पदार्थ बनवून आई जात्यावरच्या ओव्या गात पहाटेला उठून त्या कडधान्यांच्या डाळी बनवत असे. तेव्हा तिच्या मांडीवर झोपून तिच्या ओव्या ऐकण्यात खूप मजा यायची. आणि त्या डाळी वर्षभरासाठी वाळवून डब्यात भरून ठेवल्या जायच्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वत्र गहू, ज्वारी वाळवले जायचे. त्यामुळे पाखरे येऊन ते खाऊ नये म्हणून राखण्यासाठी आम्ही मुले त्याच्या आजूबाजूला पत्त्यांचा डाव मांडून राखणीसाठी बसलेलो असायचो. खळ्यात अशी ज्वारी पसरलेली असताना खूप मजा यायची. आमच्या बालपणी आम्हाला दिवसभर घरातील पदार्थ खायला हवेच असे काही नसायचे. उन्हातान्हांत हिंडून कच्च्या कैर्‍या, आंबे, फणस, जांभळे, करवंदे आणि झाडावर दगड मारून पाडलेल्या गाभुळलेल्या चिंचा खाण्याची जी मजा यायची ती आजकालच्या जंक फुडला यायची नाही. बाहेरच्या बाहेरच आमची दोन-तीन वेळा पोटे भरून निघायची.

               तसेच कितीतरी वेळा नदीवर किंवा विहिरीत डुंबायला जाण्याची आगळीच मजा असे. साबण नाही मिळाला तरी चालेल परंतु  आम्ही दिवसभर पाण्यात डुंबत बसायचो आणि त्यातून व्यायामही व्हायचा.भूकही चांगली लागायची. घरात येऊन भाकरी, ठेचा आणि चटणी तेलाबरोबर खाण्यात जी मजा यायची ती आजच्या पिझ्झा आणि बर्गरमध्ये नाही हे मात्र नक्कीच. संध्याकाळच्या वेळी गावाबाहेर क्रिकेट, आट्या-पाट्या, सुरपारंब्या यांचा खेळ खूप रंगात यायचा. कितीही आरडाओरडा केला किंवा दंगा केला तरी कुणी ओरडणारे नसल्याने मनसोक्त घाम गाळला जायचा आणि दुसर्‍या व्यायामाची गरजच नसायची. मात्र संध्याकाळी घरी आल्यावर आजोबा किंवा बाबा ओसरीवर बसून रामरक्षा आणि परवचा म्हणून घ्यायचे. ते मात्र सक्तीचे असायचे. आजीने केलेले तिखट मूटके किंवा भजी खाण्यात खूप मजा यायची. नाश्ता झाला की आजीभोवती कोंडाळे करून तिच्याकडून एक गोष्ट वदवून घ्यायची. आजी देखील तिखट मीठ लावून रोज नव्या गोष्टी आम्हाला सांगायची. रामायण ,महाभारत, 

कृष्णार्जुनाच्या पराक्रमाच्या अशा कितीतरी कथा तिच्या तोंडून ऐकण्यात आम्हाला खूप आनंद व्हायचा. त्यानंतर आमचा सागरगोट्यांचा किंवा बैठा खेळ रंगायचा. यात आजी-आजोबाही हिरिरीने भाग घ्यायचे. त्यामुळे आमच्या मनोरंजनासाठी आजी-आजोबांचा सहभाग असायचा. हल्लीच्या संयुक्त कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा जवळ राहत नसल्याने नातवंडे त्या प्रेमाला मुकली आहेत आणि आजी-आजोबांचे प्रेम किंवा जवळीक त्यांना मिळत नाही. त्यामुळे दूरदर्शन आणि मोबाइल यांची दोस्ती करत आहेत. जी डोळ्यांना आणि शरीराला त्रास देत असते. घरात एका ठिकाणी बसून खात राहिल्यामुळे स्थूलपणाही वाढीस लागला आहे. त्यामुळे   जिकडे बघावे तिकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल झाल्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदाने उरलेली नाहीत. घरी बैठे खेळ खेळल्यामुळे  मुलांच्यात मानसिक विकृती आली आहे आणि स्थूलपणा देखील वाढला आहे. थोरामोठ्यांचे सल्ले घेण्यासाठी सर्वजण एकत्र रहात नसल्यामुळे आणि प्रत्येक घरात एक किंवा दोनच मुलं असल्यामुळे आई-बाबांकडून सर्व मागण्या पूर्ण होत होतात.आईदेखील नोकरदार असल्यामुळे हल्लीची मुले फार हट्टी आणि आग्रही झाले आहेत. मागेल ती वस्तू मिळत असल्यामुळे पैशाचे मोलही राहिलेले नाही. घरात कपाट भरून महागडी   खेळणी, कपडे असल्यामुळे त्याचेही मोल असलेले दिसून येत नाही. आम्हाला त्या वस्तू मिळाल्या नाहीत त्यामुळे आम्ही आता आमच्या मुलांना घेऊन देत आहोत अशी पालकांची वृत्ती असल्यामुळे मुले आई-वडिलांकडून महागड्या वस्तू मिळवतात .परंतु ते तुटले, हरवले तरी त्याची त्यांना पर्वाही वाटत नाही. अशी बेफाम प्रवृत्ती वाढत आहे.

 सौ.भारती सावंत

मुंबई

9653445835


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.