आजी माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी जिल्हास्तरावर सैनिक दरबाराचे आयोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
- जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून सैनिक संकुलाची सुधारणा
- सैनिक वसतिगृहासाठी शासकीय योजनेतून धान्य पुरवठा करण्यासाठी प्रयत्न
- ध्वजदिन निधीसाठी व्यक्ती, संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी
सांगली, दि. 17, : आजी व माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, त्यांना योग्य न्याय मिळावा, त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागावीत यासाठी जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी जिल्हास्तरावर आजी माजी सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्यवाही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने करावी. त्याचबरोबर जिल्हा सैनिक कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करावे. तसेच सैनिक संकुलाच्या दुरूस्ती, सुशोभिकरण, सुधारणा, अंतर्गत रस्ते, खुले जिम व पायाभूत सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून निधी देवू. त्यासाठी संबंधित यंत्रणामार्फत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हा सैनिक कल्याण मंडळाची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. ए. पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अशासकीय सदस्य ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवाडकर (निवृत्त), ऑनररी कॅप्टन अशोक कुंभार (निवृत्त), एनसीसी चे सुबेदार विठ्ठल गाड, सुबेदार शिवाजीराव देशमुख (निवृत्त), गौतम लोंढे, पांडुरंग भोसले, रमेश चव्हाण, जालिंदर पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर आजी-माजी सैनिक दरबार सुरू करण्यात येणार असून जानेवारी 2022 च्या दुसऱ्या मंगळवार पासून सुरूवात होईल. या दरबारात आजी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करेल. त्याचबरोबर तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या आजी व माजी सैनिकांच्या कामांचा आढावा घेण्यात येईल. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे प्रलंबित असणाऱ्या अर्जांचा अथवा कामांचा निपटारा करण्यासाठी सविस्तर यादी जिल्हा सैनिक कार्यालयाने विद्युत मंडळाकडे सादर करावी. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत विद्युत मंडळाला सूचना देण्यात येतील. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या पाल्यांना कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रशिक्षण धोरण राबविण्यात येईल. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल.
जिल्ह्यामध्ये शहिदांच्या वारसांना जमिन मागणीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात 70 प्रकरणे असून त्यातील 19 प्रकरणे शासनाच्या निर्देशानुसार निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यात येतील. त्याचबरोबर सैनिकी मुला-मुलींचे वसतिगृह सुरू करण्यास शासनाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून धान्य पुरवठा करण्यासाठी पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार धान्य पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच माजी सैनिकांकरिता कार्यरत असलेले सीएसडी कॅन्टीन सैनिक संकुलात स्थलांतरीत करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल.
माजी सैनिकांचा आपत्ती व्यवस्थापन तथा प्रशासकीय प्रक्रियेमधील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवांची संख्या नक्की करण्यासाठी त्यांची सविस्तर माहिती सैनिक कल्याण विभागाकडे असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाने परिपूर्ण अशी सैनिक कल्याण कार्यालयाचे संकेतस्थळ निर्माण करावे. त्याचबरोबर माजी सैनिक यांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी. हा सर्व डेटा डिजीटल स्वरूपात कार्यालयाकडे जतन होईल त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावेत. सदरचे संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निधी बरोबरच सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आजी व माजी सैनिक व शहिद कुटुंबियांना सन्मानाची वागणूक देण्याबरोरबच ध्वजदिन निधीसाठी सर्व स्तरातील व्यक्ती, संस्था यांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.