मिरज सिव्हिल मध्ये सोमवारपासून नॉन कोविड रुग्णसेवा सुरु
सांगली दि.21 : मार्च २०२० पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मिरज (मिरज सिव्हिल) हे कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. असंख्य कोविड बाधित रुग्णांवर येथे यशस्वीपणे उपचार करण्यात आले. डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचा-यांनी अविरत परिश्रमाने रुग्ण सेवा देऊन रुग्णालयाचा नावलौगिक कायम राखला. सध्या कोविड रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. या रुग्णालयात नॉन कोविड रुग्णसेवा परत सुरु करण्याची जनतेची मागणी आहे व गरजही आहे. शासनाचे धोरण व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी पासून मिरज सिव्हील येथे नॉन कोविड रुग्ण सेवा सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली आहे.
रुग्णालयीन विभागांच्या बाहय रुग्ण सेवा तसेच अपघात वैद्यकीय विभाग चालू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकीत्साशास्त्र (सर्जरी),अस्थिव्यंग विभाग (ऑर्थोपेटिक्स), बालरोग विभाग (पिडीयॅट्रिक्स), स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग (ओबीजीवाय) या मुख्य चिकीत्सालयीन विभागांची आंतररुग्णसेवा मर्यादित परंतु आवश्यक प्रमाणात चालू करण्यात येत आहे.
कान नाक-घसा, नेत्र, त्वचा, मानसोपचार क्षयरोग या विभागांच्या आंतररुग्ण सेवा मात्र सांगली येथे उपलब्ध असतील. क्ष-किरण विभागाच्या सेवा या दोन्ही रुग्णालयात पूर्वीप्रमाणेच नियमितपणे उपलब्ध असतील. सांगली सिव्हील रुग्णालय येथे पूर्वीपासून प्रमाणेच सर्व प्रकारच्या नॉन कोविड रुग्णसेवा चालू राहतील. त्याचप्रमाणे मिरज सिव्हील येथील कोविड रुग्णसेवा आवश्यक प्रमाणात पूर्वी प्रमाणेच चालू राहील. ब-याच कालावधीनंतर या नॉन कोविड रुग्णसेवा मिरज सिव्हीलमध्ये चालू होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करून रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.