कोविड प्रतिरोधासाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
सांगली, दि. 30, : राज्य शासनाकडून यापूर्वी कोव्हीड-19 च्या अनुषंगाने पारित केलेले सर्व आदेश अधिक्रमित करून दि. 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये राज्यात सुधारित मार्गदर्शक सूचना पारित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोव्हीड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या संबंधातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेल्या यापूर्वीच्या सर्व आदेशांचे अधिक्रमित करून, तात्काळ प्रभावाने सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन विषयक क्षेत्रातील कार्यांना कोव्हीड-19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळेनुसार, पुढील शर्तीना अधीन राहून, खुले करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
1. कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) पालन:
जिल्हा प्रशासनाने, राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदाते, परिवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडांनुसार असेल.
2. संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता:
अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी), अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे.
ब. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तीना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.
क. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.
ड. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversal Pass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.
इ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.
3. महाराष्ट्र राज्यात प्रवास : कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निदेशांद्वारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील.
4. कोणताही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध:
अ. चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त / बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.
ब. संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत कोणत्याही समारंभांसाठी किवा समेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे), संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.
क. जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या 1 हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरोक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील, कोव्हीड-19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.
5. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निर्बंधः कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी, यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत. मात्र, जाहोर नोटोसोद्वारे 48 तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास, अमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले कोणतेही निर्बंध, जर ते पुढे चालू ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर, ते. 48 तासांनंतर अंमलात असल्याचे बंद होतील.
6. संपूर्ण लसीकरणाची व्याख्या:
संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ.
* लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्तो, असा आहे किंवा
* ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे; किंवा
* 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.
7. कोव्हीड-19 अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड :
व्याख्या: कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनंदिन सामान्य वर्तन अशी कोव्हीड-19 अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे कोव्हीड-19 अनुरूप वर्तन (CAB) म्हणून वर्णन केले जाते आशा वर्तनाच्या पैलूंमध्ये खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपद्धती काने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि/किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्य करत असेल अशा सर्व ठिकाणी अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक , इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.
1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.)
2. जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा.
3. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
4. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
5. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा.
6. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा.
7. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा: जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे.
8. सार्वजनिक ठिकाणी थुकू नका.
9. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) राखा.
10. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा..
11. कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.
शास्ती:
* या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 500/- इतका दंड करण्यात येईल.
* ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोव्हीड-19 अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोव्हीड-19 अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोव्हीड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
* जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी, रूपये 50,000/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोव्हीड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
* जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोव्हीड-19 अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोव्हीड-19 अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस किंवा वाहक यांना देखील रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजंन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोव्हीड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
* कोव्हीड-19 अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोव्हीड-19 अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय / मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार / आदेशांनुसार असतील.
या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.