Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन; 'ही' वेळ लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम लाभदायक

 नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन; 'ही' वेळ लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम लाभदायक


पुणे: यंदा दीपावली उत्सवात नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन गुरूवारी साजरे होत आहे. यात अधिक महत्त्व असणारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन गुरुवारी साजरे होत आहे. तर शुक्रवारी बलिप्रतिपदा तथा दीपावली पाडवा आहे.

नरकचतुर्दशी हा दिवाळीच्या मुख्य महोत्सवातील पहिलाच प्रधान दिवस आहे. गुरूवारी (4 नोव्हेंबर) पहाटे 4 ते 5.30 या ब्राह्म मुहूर्तावर उटणे आणि सुगंधी तेलाच्या सर्वांग मर्दनाने स्नान करावे. यापूर्वी मातेने मुलांना, पत्नीने पतीला निरांजन, दीपज्योतीने औक्षण करावे. यावेळी दरवाजात, देवघरात, तुळशी वृंदावनाजवळ पणत्या प्रज्वलित कराव्यात. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीखान्यातून अबलांना मुक्त केल्याचा दिवस होत. ज्यांच्या आप्त मित्रांकडे एखाद्या दुर्घटनेने दिवाळी नसेल त्यांच्या घरी देवासमोर फराळ ठेवणे हा मानवताधर्म प्रत्येकानेच पाळावा. देवदर्शन करुन घरी सर्वांनी एकत्र फराळ करत दीपोत्सवाचा आनंद घ्यावा, अशी माहिती शारदाज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी दिली.

सायंकाळी 6.02 ते 8.34 पर्यंत सर्वोत्तम मुहूर्त


लक्ष्मीपूजनाची अमावस्या गुरूवारी आहे. वर्षभरातील अमावस्यांपैकी हीच अश्‍विन अमावस्या लक्ष्मीपूजनामुळे सर्व मंगल आहे. यावर्षी सायंकाळी 6.02 ते 8.34 ही वेळ लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम लाभदायक मुहूर्त आहे. घरोघरी, दुकानांत, कार्यालयांत, उद्यमसंस्थांतून लक्ष्मीपूजन वैभवी श्रीमंती थाटाने केले जाते. लक्ष्मीपूजन म्हणून सुवर्णमुद्रा, सोने-चांदी, हिरे, माणिक आदी रत्नांचे दागिने आदीचे पूजन करण्यात येते. चौरंगावर सुशोभित भरजरी वस्त्रांनी वेष्टीत आसनावर तांदूळ, त्यावर फुले ठेवावी. त्यावर तांदूळ किंवा फुळांचे कमळ काढून या 'कमला महालक्ष्मीचे' थाटात पूजन करावे. मंगलवाद्यांच्या सुस्वरात, फटाक्‍यांच्या दणदणाटात, दीपोत्सवी झगमगाटात पूजन साजरे करण्याचा वर्षातील अतिमहत्त्वाचा, आपले वैभव दाखवणारा, वाढवणाऱ्या 'मंगल मंगलानाम' असा दिवस असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.