एचआयव्ही बाधितांच्या उपचारासाठी डायलेसिस मशिन व कार्यालयासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 29, : एचआयव्ही बाधित रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी डायलेसिस मशिन खरेदी करण्यासाठी व अनुषंगिक उपाययोजनांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा. तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत आदि उपस्थित होते.
जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गाचा आलेख उतरत असून 2010 साली 3 हजार 213 रूग्णांची संख्या होती. ऑक्टोबर 2021 मध्ये 357 इतकी रूग्णसंख्या आहे. एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2021 या सात महिन्याच्या कालावधीत 48 हजार 118 जणांचे एचआयव्ही टेस्टींग करण्यात आले. यामध्ये एचआयव्ही बाधित 217 रूग्णांवर एआरटी सेंटरव्दारे उपचार सुरू आहेत. असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, रक्तदात्यांमध्ये काहींचे रक्त तपासणीचे अहवाल हे एचआयव्ही पॉझिटीव्ह येतात अशा व्यक्तींना त्वरीत संपर्क साधून याबाबत अवगत करावे. त्याचबरोबर एचआयव्ही बाधित रूग्णांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा. अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 431 प्रकरणे मंजूर झाली आहेत. तसेच एचआयव्हीने मृत्यू पावलेल्या रूग्णांच्या वारसांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात यावेत. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 1 हजार 795 प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचाही लाभ देण्याची कार्यवाही तातडीने व्हावी. दि. 1 डिसेंबर 2021 रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात एड्स जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.