मोदी सरकार चले जाव'च्या घोषणा देत काँग्रेसचे सांगलीत जोरदार जनजागरण
सांगली, दि.२८ : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत, त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. ही भाववाढ कमी करण्यासाठी तसेच मोदी सरकारला जागे करण्यासाठी म्हणून आज काँग्रेसच्यावतीने सांगलीत जोरदार जनजागरण अभियान राबविण्यात आले. 'चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव' अशा घोषणा देत या सरकारला घालवण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.
जनजागरण आंदोलनाचे नेतृत्व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, जिल्हा प्रभारी संजय बालगुडे, सहप्रभारी अभय साळुंके, पै. नामदेवराव मोहिते आदींनी केले.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, मोदी सरकारने महागाई वाढवून देशातल्या सर्वसामान्य जनतेला उद्धवस्त केले आहे. या सरकारने सामान्य माणसाच्या जगण्याचा कधी विचारच केला नाही. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मोदी सरकारचे हे चुकीचे धोरण तळागाळात नेऊन पोहोचवले पाहिजे, हे काम कार्यकर्त्यांना करायचे आहे. येत्या तीन वर्षात या सरकारला जनतेसमोर उघडे पाडले पाहिजे. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने महागाईविरोधात आंदोलने सुरू आहेत.
ते म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात खूप चांगले काम करून दाखवले आहे. या राज्याला भयंकर अशा कोरोनापासून वाचवले आहे. महापुराच्या काळातही मोठी कामगिरी बजावली आहे. अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी व सांस्कृतिक राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आहे.
विशाल पाटील म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. मोदी सरकारची चुकीची धोरणे लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी हे अभियान कार्यकर्त्यांनी नेटाने पुढे नेले पाहिजे.
संजय बालगुडे म्हणाले, मोदी सरकारने देशातल्या प्रचंड मोठ्या असलेल्या उद्योजकांची कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, त्यांना देशोधडीला लावले. महागाईमुळे लोकांना जगता येईना अशी परिस्थिती आहे.
अभय साळुंके म्हणाले, मोदी सरकारने देशाची लूट केली आहे. ते देश विकू लागले आहेत, त्यामुळे देशाला वाचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्याची सुरुवात हरिपूरच्या पवित्र संगमेश्वर मंदिरापासून होते, याचा मला आनंद आहे. सांगली जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला झाला पाहिजे.
यावेळी नामदेवराव मोहिते, नामदेव कस्तुरे, मनीषा रोटे, करिम मेस्त्री, अमित पाटेकर यांची भाषणे झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी जनजागरण अभियान सुरू झाले. हरिपूरला संगमेश्वर मंदिराजवळ अभियानाचा समारोप करण्यात आला. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतीविरोधात घोषणा देत जोरदार आवाज उठवण्यात आला.
आंदोलनात नंदकुमार कुंभार, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते जितेंद्र पाटील, अप्पासाहेब पाटील, रविकुमार पाटील, राजेंद्र शिंदे, सुरेश पाटील, दिगंबर पाटील, रविराज शिंदे, नगरसेवक मंगेश चव्हाण, मनोज सरगर, फिरोज पठाण, रवींद्र वळवडे, मयूरशेठ पाटील, रवींद्र खराडे, बिपिन कदम, प्रशांत देशमुख, प्रमोद सूर्यवंशी, मालन मोहिते, सुवर्णा पाटील, अजित शिरगावकर, अकबर मोमिन, राजेंद्र कांबळे, इरफान शिकलगार, माणिक कोलप, नामदेव पाताडे, बाबासाहेब कोडग, अरविंद पाटील, तुकाराम माळी, अशोकसिंग रजपूत, आशिष चौधरी, विजय आवळे, शुभम बनसोडे, नामदेव चव्हाण, सुरेश मोहिते, ताजुद्दीन तांबोळी, प्रशांत आहिवळे, याकूब मणेर, अरविंद जैनापुरे, सागर काळे, सूर्यकांत लोंढे, भारती भगत, अशा पाटील, क्रांती कदम, नाना घोरपडे, आदी सहभागी झाले होते. अजित ढोले यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.