Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हर घर दस्तक' कोरोना लसीकरण मोहिम यशस्वी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 हर घर दस्तक' कोरोना लसीकरण मोहिम यशस्वी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 15,  : कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे  अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात ८० टक्के लोकांनी पहिला डोस तर ३९ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. ज्यांनी अद्याप लस घेतली नाही व ज्यांनी दुसरा डोस विहीत कालावधी संपूनही घेतलेला नाही अशा नागरिकांचे लसीकरण व्हावे. यासाठी राज्य शासनामार्फत ३० नोव्हेंबर पर्यंत 'हर घर दस्तक' लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंब व त्यातील व्यक्तींचे कोरोना लसीकरणासाठी सर्व्हेक्षण करावे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी सुक्ष्म नियोजित आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनास सादर करावा. लसीकरणाच्या याद्या अद्ययावत कराव्यात. शहरी व ग्रामस्तरावर गल्लीनिहाय लसीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करून 'हर घर दस्तक' कोरोना लसीकरण मोहिम यशस्वी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोविड-१९ लसीकरण जिल्हा समन्वय समिती आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे,‍ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रूग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले,  'हर घर दस्तक' ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी प्राधान्याने राबविण्यात यावी. या मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. या मोहिमेत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, एनएमएम, प्राथमिक शिक्षक, एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींचाही समावेश करून घ्यावा. हर घर दस्तक मोहिम तळागाळापर्यंत जाण्यासाठी शहरी भागात वॉर्डनिहाय तर गाव भागात गल्ली निहाय लसीकरण मोहिम राबवून संपूर्ण जिल्हा लसयुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करा. ज्या भागात लसीकरण कमी झाले आहे अशी ठिकाणे निवडून या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिकांना, ग्रामस्थांना प्रवृत्त करावे. लसीकरणाबाबत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रचार मोहिम राबविण्यावर भर द्यावा. ज्या व्यक्तींचा दुसरा डोस झालेला नाही त्यांना त्याबाबत अवगत करावे. त्यासाठी एसएमएस व प्रत्यक्ष भेट देवून लसीकरणासाठी प्रवृत्त करावे.‍ ज्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत त्या कॅम्पच्या दिनांकाच्या आधी दोन ते तीन दिवस आधी प्रचाराची मोहिम राबवून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात यावी. जिल्ह्यात खाजगी उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे बरेच नागरिक, ग्रामस्थ उपचारासाठी येतात अशावेळी खाजगी डॉक्टरांनीही लसीकरणाचे महत्व त्यांना सांगून ज्यांनी लस घेतली नाही अथवा दुसरा डोस घेतला नाही त्यांनी लसीकरण करून घेण्याबाबत प्रवृत्त करावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले. 


जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी लसीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करताना सांगितले, जिल्ह्यात लसीकरणासाठी २१ लाख ८० हजार ८०० नागरिक पात्र असून यापैकी १७ लाख ४८ हजार ५९७ नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाचा  पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी ८०.१८ इतकी आहे. तर ८ लाख ६३ हजार ५०८ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ३९.६० इतकी आहे.

तालुकानिहाय कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या व कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे. आटपाडी - पात्र नागरिक - १ लाख ५ हजार ९२४, पहिला डोस - ९३ हजार ३९६ (८८.१७), दुसरा डोस - ३९ हजार ९९५ (३७.७६). जत - पात्र नागरिक - २ लाख ५१ हजार १८२, पहिला डोस - १ लाख ६० हजार ३४० (६३.८३), दुसरा डोस - ५३ हजार ५२५ (२१.३१). कडेगाव - पात्र नागरिक - १ लाख ९ हजार ४१६, पहिला डोस - ९५ हजार ८१० (८७.५७), दुसरा डोस - ४६ हजार ७९७ (४२.७७). कवठेमहांकाळ - पात्र नागरिक - १ लाख १६ हजार ५३७, पहिला डोस - १ लाख ११ (८५.८२), दुसरा डोस - ५२ हजार ७७ (४४.६९). खानापूर - पात्र नागरिक - १ लाख ३० हजार २२१, पहिला डोस - ९९ हजार ५८० (७६.४७), दुसरा डोस - ४१ हजार ८१९ (३२.११). मिरज - पात्र नागरिक - २ लाख ६९ हजार १३३, पहिला डोस - २ लाख १७ हजार १३९ (८०.६८), दुसरा डोस - ९९ हजार ४६८ (३६.९६). पलूस - पात्र नागरिक - १ लाख २६ हजार १६२, पहिला डोस - १ लाख ७८६ (७९.८९), दुसरा डोस - ५२ हजार २४९ (४१.४१). शिराळा - पात्र नागरिक - १ लाख २४ हजार ६३४, पहिला डोस - १ लाख १४ हजार ५४५ (९१.९१), दुसरा डोस - ६४ हजार २७४ (५१.५७). तासगाव - पात्र नागरिक - १ लाख ९२ हजार ३३२, पहिला डोस - १ लाख ६० हजार ५७४ (८३.४९), दुसरा डोस - ७७ हजार ९५७ (४०.५३). वाळवा - पात्र नागरिक - ३ लाख ४८ हजार ८६१, पहिला डोस - २ लाख ९६ हजार ८०६ (८५.०८), दुसरा डोस - १ लाख ६७ हजार ९८५ (४८.१५). महानगरपालिका क्षेत्र - पात्र नागरिक - ४ लाख ६ हजार ४००, पहिला डोस - ३ लाख ९ हजार ६१० (७६.१८), दुसरा डोस - १ लाख ६७ हजार ३६२ (४१.१८).


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.