कोरोना लशीचा दुसरा डोस लोक का घेत नाहीयेत?
तज्ज्ञांच्या मते, लोकांमध्ये कोरोनाबाबत दिवसेंदिवस कमी होणारी भीती, कोरोनाग्रस्त रुग्णांची सातत्याने कमी होणारी संख्या, कोव्हिडविरोधी लशीबाबतचे गैरसमज आणि इतर कारणांमुळे लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 80 टक्के लोकांनी कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस घेतलाय. तर, लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र, फक्त 40 टक्के आहे.केंद्र सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्सचे डॉ. पॉल यांनी, देशभरात 10 कोटी लोकांनी कोव्हिडविरोधी लशीचा दुसरा डोस न घेतल्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
दुसरा डोस बाकी असलेल्या नागरिकांची संख्या किती?
राज्यात कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाने वेग घेतला. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. कोरोनापासून सुरक्षा मिळावी यासाठी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांच्या लांबच-लांब रांगा पहायला मिळाल्या. तज्ज्ञ सांगतात, पण ऑगस्टपासून हे चित्र बदललंय. कोरोनासंसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने लसीकरणाकडे लोकांचा ओढा कमी झालेला पहायला मिळतोय. लस घेण्यासाठी लोक खरंच दुर्लक्ष करू लागलेत का? हे तपासण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. तर, राज्यभरात 92 लाखांपेक्षा जास्त लोकांचा लशीचा दुसरा डोस बाकी असल्याचं निदर्शनास आलं.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,
कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या 77 लाख 12 हजारापेक्षा जास्त
तर 15 लाख 38 हजार नागरिकांनी कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाहीये
(22 नोव्हेंबरपर्यंत)
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) अमरावती विभागाचे अध्यक्ष, फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अनिल रोहनकर म्हणाले, "ऑगस्टपासून महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाची साथ नियंत्रणात आलीये. त्यामुळे कोरोनाविरोधी लस घेण्याकडे लोक दुर्लक्ष करू लागलेत."
लशीचा दुसरा डोस बाकी असलेल्यांची जिल्हानिहाय आकडेवारी
पुणे- 12,04,872
मुंबई- 7,75,191
नागपूर- 5,88,154
ठाणे- 4,89,618
कोल्हापूर- 4,86,742
औरंगाबाद- 3,08,542
गोंदिया- 2,32,395
सोलापूर- 2,23,540
बुलढाणा- 1,98,498
अमरावती- 1,94,658
परभणी- 1,53,421
राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये लाखापेक्षा जास्त लोकांचे कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस बाकी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.