Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज ठाकरे - शरद पवार भेट; एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी; दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

राज ठाकरे - शरद पवार भेट; एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी; दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार


मुंबई : एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढायचा हालचाली सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एसटी संपासंदर्भात भेट घेतली.

शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा म्हणजे त्यांचा पगार वाढेल आणि ते संप मागे घेतील, अशी मागणी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या समोर ठेवल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली आहे. ते सध्या त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार आणि राज ठाकरे हे दोघेही उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

एकीकडे राज्य सरकार संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करत आहे. आत्तापर्यंत 2053 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 2000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे घाटत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत आज तरी संपावर तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज ठाकरे आणि त्यांच्या बरोबरच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या समोर ठेवल्या आहेत. स्वतः पवार आणि राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार आहेत. त्यानंतर संपावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.


- संप मोडण्याची तयारी

मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप कर्मचाऱ्यांचा संप अधिकच चिघळला असून एसटी महामंडळाने कर्मचारी निलंबित करण्याचा सपाटा लावला आहे. त्याच वेळी हा संप मोडीत काढून 2000 नवीन कर्मचाऱ्यांना तातडीने रूजू करून घेण्याच्या हालचाली महामंडळाने सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा असल्याचे म्हटले असल्याने हा मोठा आधार महाविकास आघाडी सरकारला मिळाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून 2000 नव्या उमेदवार कर्मचार्‍यांना रुजू करून घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

एसटी महामंडळाने आधीच 2500 उमेदवारांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यामध्ये वाहक, बसचालक यांचाही समावेश आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत रूजू करून घेतल्यावर एसटीची सेवा संपकरी कर्मचार्‍यांच्या शिवाय सुरळीत करण्याचे घाटत आहे.


दरम्यानच्या काळात एसटी महामंडळाचे अधिकारी स्वत:च बुकिंगला बसले असून मुंबई, पुणे, नाशिक येथून शिवशाही बसेस बुकिंग ते करत आहेत. शिवशाहीची सेवा या अधिकाऱ्यांनी सुरू करून दिली आहे.

- 2053 कर्मचारी निलंबित

तत्पूर्वी एसटी महामंडळाने संप सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकूण 2053 कर्मचारी निलंबित केले असून यापैकी 1135 कर्मचाऱ्यांना काल एका दिवसात निलंबित केले आहे.

दरम्यानच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना या संपात मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मी मध्यस्थी करेन पण कोणत्याही कर्मचाऱ्याने आत्महत्या करता कामा नये याची हमी द्यावी, असे ते कर्मचाऱ्यांना म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

एकीकडे संपावर तोडगा काढण्याची भाषा सरकारकडून होत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांशी मात्र सरकार कठोरपणे वागताना दिसत आहे. त्याच वेळी खासगी बस वाहतूकदारांनी जी मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ करून प्रवाशांची लुबाडणूक चालू केली आहे त्यावर मात्र महाविकास आघाडी सरकारला परिणामकारकरित्या प्रतिबंध घालता आलेला नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.