Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम 15 ते 25 नोव्हेंबर कालावधीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम 15 ते 25 नोव्हेंबर कालावधीत  - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



घरी भेटी देणाऱ्या स्वयंसेवकाकडून आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करा - खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी क्षयरूग्ण नोंदणी करून सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिमेस हातभार लावावा


सांगली, दि. 15, : कोविड-19 पश्चात इतर आजाराप्रमाणे क्षयरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच दुर्गम भागातील अनेक रूग्ण आरोग्य सुविधांचा उपयोग करून घेवू शकत नाहीत किंबहुना दूरच राहतात. अशा रूग्णापर्यंत पोहचून त्यांच्यावर योग्य औषधोपचार व्हावा तसेच जनसामान्यामध्ये क्षयरोविषयी जनजागृती व्हावी याउद्देशाने सांगली जिल्ह्यामध्ये दि. 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत घरी भेटी देणाऱ्या स्वयंसेवकाकडून आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे. तसेच यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी क्षयरूग्ण नोंदणी करून सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम राबविण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, जिल्हा पी.पी.एम. समन्वयक पी. जी. जोशी आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, खाजगी क्षेत्रामध्ये निदान होणाऱ्या व उपचार घेणाऱ्या सर्व क्षयरूग्णांची माहिती प्रयोगशाळा, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, उपचार करणारे सर्व पॅथेचे वैद्यकीय व्यवसायिक, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व खाजगी औषधे विक्रेते यांनी शासकीय यंत्रणेला देऊन रूग्ण नोंद करणे बंधनकारक आहे. अन्यथा माहिती लपविणाऱ्या विरूध्द भा.दं.वि. कलम 269, 270 नुसार 6 महिने ते 2 वर्षापर्यंतची शिक्षा व दंड अशा प्रकारच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. तरी सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी क्षयरूग्ण नोंदणी करून सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये दुर्गम भागासह विटभट्टी, ऊसतोड कामगार, झोपडपट्टी, सुतगिरणी, खाण कामगार इत्यादी अति जोखमीच्या भागाचे सर्वेक्षण पथकामार्फत करण्यात येणार आहे. याकरिता सांगली जिल्ह्यामध्ये 3 लाख 37 हजार 292 इतक्या अति जोखमीची लोकसंख्या असणाऱ्या भागाचे सर्वेक्षण 169 पथकामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, यामध्ये प्रामुख्याने दोन आठवड्याचा खोकला, ताप येणे, वजनात घट होणे, भुक न लागणे अशा प्रकारांची लक्षणे असणाऱ्या संशयित क्षयरूग्णांचे बेडका नमुना व एक्सरे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. सर्वेक्षण दरम्यान 16 हजार 500 हून अधिक  संशयित रूग्णांची तपासणी करून अडीच हजार रूग्ण शोधण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.