Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिठाई व इतर अन्न पदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले गुणवत्तेविषयी तक्रार असल्यास तक्रार नोंदवा

मिठाई व इतर अन्न पदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले गुणवत्तेविषयी तक्रार असल्यास तक्रार नोंदवा


सांगली, दि. 25,  : सणासुदीच्या काळात जसे दिवाळी सणांमध्ये जनतेकडून मोठ्या प्रमाणात मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ व तयार अन्नपदार्थ खरेदी होवून सेवन होत असले तरी मिठाई  व इतर अन्न पदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.

मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ती ताजी आहे याची खात्री करून किमान आवश्यकतेनुसार खरेदी करावी व बिलाशिवाय ते खरेदी करू नयेत. तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थ नोंदणीधारक व परवानाधारक व्यावसायिकांच्याकडूनच खरेदी करण्याबाबत आग्रही रहावे. उघड्यावरील मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये. तसेच फेरिवाल्याकडून खवा (मावा) खरेदी करणे टाळावे. माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासांच्या आत करावे. तसेच त्याची साठवणूक योग्य तापमानास / फ्रिजमध्ये करावी. बंगाली व तत्सम मिठाईचे सेवन शक्यतो 8 ते 10 तासांच्या आत करावे. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास तिचे सेवन न करता ती नष्ट करावी. मिठाई खराब झाल्याची शंका असल्यास अथवा चवीत फरक जाणवला तर त्याचे सेवन न करता ती नष्ट करावी. पॅकिंगमधील मिठाई खरेदी करताना मिठाईच्या बॉक्सवर उत्पादकाचा पत्ता, पॅकिंग दिनांक व बेस्ट बिफोर बघुनच मिठाई खरेदी करावी. ग्राहकांना गुणवत्तेविषयी काही तक्रार असल्यास सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सांगली यांच्याकडे तक्रार नोंदवावी (संपर्क नं. 0233-2602202/2602201), असे आवाहनही श्री. चौगुले यांनी केले आहे.

सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनातर्फे धडक मोहिम राबविण्यात येणार असून त्यामध्ये भेसळीचा संशय असलेले खाद्यतेल/मिठाई/खवा/तूप/आटा/रवा/मैदा यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असून संशय येईल त्या ठिकाणी जप्ती करण्यात येणार आहे. चुकीचे मार्क असलेले खाद्यतेल पॅकिंग, विक्री करताना आढळल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.