तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई
मुंबई: भारतीयांना सोन्याविषयी असणारे आकर्षण ही काही नवी बाब नाही. आजही अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचा दर हा गगनाला भिडल्याने या धातूला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अजूनही लोक मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी करताना दिसतात.
मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ज्याप्रकारे परदेशातून सोने आणण्यावर मर्यादा आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे किती सोनं असावं, यावरही आहेत.
घरात किती सोनं साठवू शकता?
घरात सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाने सोनं खरेदी केलं असेल आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर घरात कितीही सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या माहितीनुसार, तुम्ही घरी सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकता. मात्र, आयकर विभागाकडून घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची तपासणी होऊ शकते. तुमच्या घरात 50 लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचे दागिने असतील तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ते नमूद करावे लागते.
आयकर विभागाने याबाबत आणखी काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार लग्न झालेल्या स्त्रीला घरात 500 ग्रॅम दागिने ठेवण्याची मुभा आहे. तर अविवाहीत स्त्री घरात 250 ग्रॅम तर पुरुषांना घरात 100 ग्रॅम सोने बाळगण्याची मुभा आहे. या सोन्याच्या विक्रीवर भांडवली कर भरावा लागतो.
.तर घरातील सोनं जप्त होईल
प्राप्तिकर अधिनियम 1961च्या कलम 132 नुसार तपासादरम्यान जर संबंधित व्यक्ती सापडलेल्या कोणत्याही मूल्यवान वस्तूला किंवा दागिन्याच्या संदर्भात योग्य माहिती देऊ न शकल्यास किंवा उत्पन्नाचे योग्य स्त्रोत दाखवू न शकल्यास प्राप्तिकर अधिकारी जप्त त्या वस्तू जप्त करू शकतात. प्राप्तिकराशी निगडीत कोणत्याही प्रकरणात जर संबंधित व्यक्तीने मागील वर्षी भरलेला प्राप्तिकर हा विकत घेतलेल्या सोन्याच्या किंमतीशी मेळ खात नसल्यास प्राप्तिकर अधिकारी सोन्याचे दागिने किंवा मूल्यवान वस्तू यांना जप्त करू शकतात. पण एका विशिष्ट मर्यादेच्या खाली आयकर विभागही सोन्याचे दागिने जप्त करु शकत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.