प्रियांका गांधी यांच्या अटकेचा सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने तीव्र निषेध योगी सरकार प्रियंका गांधींना घाबरले - पृथ्वीराज पाटील
सांगली, दि. ४ : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या लखीमपूर येथील पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा व धक्काबुक्कीचा सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व पदाधिकारी यांनी निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून तालीबानी सरकारचे राज्य आहे का ? असा सवाल श्री. पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केला.
काँग्रेस कमिटीसमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. श्री पाटील म्हणाले, मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाडी घालून त्यांना चिरडले. त्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी उत्तर प्रदेशचे योगी सरकार आटापिटा करत आहे. या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले. त्यांना बेकायदेशीररित्या अटक केली. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत.
ते म्हणाले, प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जात असताना रस्त्यावर अनेक ठिकाणी अडवण्यात आले. प्रियंका यांना भारतीय जनता पक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का घाबरतात ? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का ? उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अत्याचारी राजवटीला तेथील जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
यावेळी शैलजाभाभी पाटील, करीम मिस्त्री, वृषाली वाघचौरे, बिपिन कदम, सनी धोत्रे, अजित ढोले, सोहेल बलबंड, अल्ताफ पेंढारी, अशोक वारे, सागर काळे, रघुनाथ नार्वेकर, मौलाली वंटमोरे, पैगंबर शेख, नामदेव पठाडे, देशभूषण पाटील, आशिष चौधरी, राजेंद्र कांबळे, प्रशांत अहिवळे, चेतन पाटील, विठ्ठलराव काळे, सुनील गुळवणी, राजू कलाल, वांडरे, नारायण जाधव आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.