Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोविड लसीचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांनी त्वरीत लस घ्यावी - जिल्हा‍धिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कोविड लसीचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांनी त्वरीत लस घ्यावी - जिल्हा‍धिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्ह्यात विहीत कालावधीत दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या 1 लाख 93 हजार 684 लसीकरणासाठी सर्वच यंत्रणाचे निकराचे प्रयत्न आवश्यक


सांगली, दि. 1,  : सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 16 लाख 10 हजार 693 जणांनी पहिला डोस तर 6 लाख 46 हजार 709 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात विहित कालावधी उलटल्यानंतरही दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या 1 लाख 93 हजार 684 इतकी मोठी आहे. लसीकरणासाठी आवश्यक डोसही उपलब्ध आहेत. तरी ज्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी त्वरीत तो घ्यावा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. याबरोबरच कोरानाचे संकट अद्यापही पुर्णत: टळलेले नाही. त्यामुळे ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशांनीही आपला पहिला डोस लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहनही जिल्हा‍धिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 

कोवीड -19 लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी विवेक पाटील, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी रविंद्र ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा सविस्तर आढावा घेत असताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी विहित मुदत संपल्यानंतरही मोठ्या संख्येने दुसरा डोस प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगून ही प्रलंबितता लवकरात लवकर संपविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक गतीमान व्हावे. याबरोबरच लोकांना दुसरा डोस घेण्याबाबत सजग करण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणा, महिला व बाल विकास यंत्रणा, शिक्षण यंत्रणा, आरोग्य यंत्रणा व अन्य संबंधित यंत्रणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. ज्या गावांमध्ये दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांची संख्या जास्त आहे, अशा गावांमध्ये लसीकरणासाठी विशेष मोहिम घेण्याबाबतही निर्देशित केले. यावेळी त्यांनी दुसरा डोस ज्यांचा प्रलंबित आहे अशांच्या गावनिहाय याद्या तयार करून त्यांच्याशी कॉल सेंटर्सव्दारे सातत्याने संपर्क साधावा. तयार केलेल्या याद्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाही द्याव्यात व त्यानांही लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याबाबत आवाहन करावे. 

जत तालुक्यात जिल्ह्यातील अन्य भागाच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकचे मनुष्यबळ उपयोगात आणावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात ज्या घटकात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्या घटकांसाठी स्वतंत्र माहिती, शिक्षण व संप्रेषण आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.

 जिल्ह्यात 21 लाख 80 हजार 800 लोकसंख्या लसीकरणासाठी पात्र असून यामध्ये 74 टक्के म्हणजेच 16 लाख 17 हजार 159 जणांनी पहिला डोस तर 29.85 टक्के म्हणजेच 6 लाख 51 हजार 68 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये विहीत कालावधी उलटल्यानंतरही दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या 1 लाख 93 हजार 684 इतकी मोठी आहे. ही प्रलंबितता संपविण्यासाठी विशेष व अथक प्रयत्न यंत्रणांनी करावेत, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ज्यांनी अद्याप पहिला डोस घेतला नाही त्यांनाही लसीकरणासाठी उद्युक्त करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तालुकानिहाय झालेले लसीकरण पुढीलप्रमाणे. शिराळा – उद्दिष्ट 1 लाख 24 हजार 634, पहिला डोस घेतलेले 1 लाख 9 हजार 965, दुसरा डोस घेतलेले 50 हजार 125.  कडेगाव - उद्दिष्ट 1 लाख 9 हजार 416, पहिला डोस घेतलेले 89 हजार 914, दुसरा डोस घेतलेले 34 हजार 472.  कवठेमहांकाळ - उद्दिष्ट 1 लाख 16 हजार 537, पहिला डोस घेतलेले 93 हजार 203, दुसरा डोस घेतलेले 35 हजार 202. आटपाडी - उद्दिष्ट 1 लाख 5 हजार 924, पहिला डोस घेतलेले 84 हजार 312, दुसरा डोस घेतलेले 31 हजार 304. वाळवा - उद्दिष्ट 3 लाख 48 हजार 861, पहिला डोस घेतलेले 2 लाख 75 हजार 161, दुसरा डोस घेतलेले 1 लाख 24 हजार 316. तासगाव - उद्दिष्ट 1 लाख 92 हजार 332, पहिला डोस घेतलेले 1 लाख 51 हजार 234, दुसरा डोस घेतलेले 62 हजार 204. मिरज - उद्दिष्ट 2 लाख 69 हजार 133, पहिला डोस घेतलेले 2 लाख 2 हजार 554, दुसरा डोस घेतलेले 82 हजार 69. पलसू - उद्दिष्ट 1 लाख 26 हजार 162, पहिला डोस घेतलेले 94 हजार 941, दुसरा डोस घेतलेले 40 हजार 569. खानापूर - उद्दिष्ट 1 लाख 30 हजार 221, पहिला डोस घेतलेले 88 हजार 878, दुसरा डोस घेतलेले 31 हजार 731. जत - उद्दिष्ट 2 लाख 51 हजार 182, पहिला डोस घेतलेले 1 लाख 38 हजार 382, दुसरा डोस घेतलेले 35 हजार 816. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका - उद्दिष्ट 4 लाख 6 हजार 400, पहिला डोस घेतलेले 2 लाख 83 हजार 4, दुसरा डोस घेतलेले 1 लाख 19 हजार 502.

जिल्ह्यात आजअखेर कोविशिल्ड लसीचे 22 लाख 28 हजार 130 तर कोव्हॅक्सीन लसीचे 1 लाख 86 हजार 960 डोसेस प्राप्त झाले आहेत. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.