शरद पवार मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीच्या मैदानात, पण.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत असून या निवडणुकीत शरद पवार यांच्या सहित 16 उमेदवारांना मतदानाचा अधिकार नाही. यामुळे निवडणूक कोणत्या नियमाखाली घेतली जात आहे, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
शरद पवार यांच्या विरोधात धनंजय शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. आज होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर इथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही साखर कारखान्याची, बँकांची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार सुरू आहे, ही दंडेलशाही आहे या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उमेदवार विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहेत. पवारांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते हे काही जणांना माहीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बाबत करण्यात आलेल्या आरोपाला उत्तर दिले जाईल, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.
गलगलींची तक्रार
आज रविवारी, 24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 ते 1 वाजता नायगाव येथील संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात होत आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असून धनंजय शिंदे यांनी आव्हान दिले आहे. अनिल गलगली यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून 34 ऐवजी 6000 पेक्षा अधिक मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. विशेष म्हणजे ज्या 34 मतदारांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यात 16 उमेदवारांना समावेश नाही. अनिल गलगली यांच्या मते संस्थेच्या घटनेच्या कलम 10:1 प्रमाणे 6000 पेक्षा अधिक मतदार असताना जाणूनबुजून फक्त 34 मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
मैदानात कोण कोण?
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे आहेत. दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार आहेत. डॉ. भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांची नेमणूक शरद पवार यांच्या सूचनेनुसार 2017पासून वादग्रस्तरित्या झाली असून याबाबत अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे.
विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा साधा अर्जही भरला नव्हता. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. संग्रहालयाच्या सर्व सभासदांना घटनेप्रमाणे निवडणूकीत भाग घेण्याचा हक्क असूनही संग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फक्त 34 सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या हाती संग्रहालयाची सूत्रे सोपवण्याचा घाट घातला आहे, अशी चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.