संजय राऊतांनी भाजपला झोडपलं; पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का?
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी इथल्या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेत निरापधार लोकांचे बळी गेलेत. पंतप्रधान मोदी संवेदनशील आहेत. मग या घटनेवेळी त्यांची संवेदना कुठे गेली होती. कळस म्हणजे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी अडवून धरलं. त्यांना स्थानबद्ध केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का?, असे एक ना अनेक सवाल विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला झोडपून काढलं.
लखीमपूर खिरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने अंगावर गाडी घालण्याचा पराक्रम गाजवला असा शेतकऱ्यांचा दावा आहे. याचविषयी बोलताना संजय राऊत यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.
उत्तर प्रदेशात राम राज्य आहे?
उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचं निर्माण सुरु आहे. पण खरंच तिथे राम राज्य आहे का?, असा सवाल राहून राहून पडतोय. कारण ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलकांना चिरडण्यात आलं, ते पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल, असं राऊत म्हणाले.
'तर भाजपने रस्त्या रस्त्यावर फुगड्या घातल्या असत्या'
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप आहे. याच विषयी बोलताना राऊतांनी भाजपवर प्रहार केला. 'जर महाराष्ट्रात असा प्रकार घडला असता तर भाजपने रस्त्या-रस्त्यावर फुगड्या घातल्या असत्या', असं राऊत म्हणाले.
देशासाठी ज्या कुटुंबाचा मोठा त्याग, प्रियांका त्या कुटुंबातून, त्यांचा गुन्हा काय?
प्रियांका गांधींच्या स्थानबद्धतेवर बोलताना त्यांनी मोदी आणि योगी सरकारला खडे बोल सुनावले. तुमचं राजकीय वैर असू शकतं, हे मान्य आहे पण ज्या कुटुंबाने देशासाठी एवढा मोठा त्याग केला आहे, प्रियांका त्या कुटुंबातून येतात. प्रियांका गांधींशी पोलिसांचं वागणं अत्यंत असभ्य होतं. पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली हे सर्वांनी पाहिलं. त्यांचा गुन्हा काय होता ती त्यांना ताब्यात घेतलं गेलं? केवळ राजकारण करायचं म्हणून करु नका, असा सल्लाही त्यांनी मोदी आणि योगी सरकारला दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.