जरंडेश्वर'च्या वादाचे धुराडे पुन्हा पेटणार
सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या पुन्हा बुधवारपासून (दि. 6) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून चिमणगाव येथे सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर भाजपच्या राजकीय हालचालींनी जरंडेश्वरच्या वादाचे धुराडे पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
आजारी साखर कारखाने अवमूल्यनात विकत घेण्यासंदर्भातील मोडस ऑपरेंडीवर सध्या सौमैय्या यांचे लक्ष आहे. मागील आठवड्यात सातारा ते कोल्हापूर असा दौरा सोमैय्या यांनी करून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच भ्रष्टाचाराची तोफ डागली. या हाय व्होल्टेज ड्राम्यात पोलिसांची चांगलीच कसरत झाली.
आता सोमैय्या यांनी सातारा- कोरेगाव- फलटण- बारामती- हडपसर असा दौरा आखला असून बुधवारी दि. 6 रोजी या दौऱ्याला सुरवात होत आहे. किरीट सौमैय्या पहाटे सव्वातीन वाजता वाठार स्टेशन रेल्वे स्थानकावर येणार असून तेथून ते सातारा शासकीय विश्रामगृहात येथे येणार आहेत.
चिमणगाव येथे सकाळी अकरा वाजता जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांशी ते संवाद साधणार आहेत. तिथून पुसेगाव, डिस्कळ येथील दौऱ्यानंतर फलटणला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजभवन यानिवासस्थानी पुन्हा राजकीय चर्चा रंगणार आहेत. त्यानंतर सोमैय्या यांचा दौरा पुणे जिल्ह्यात बारामती- जेजुरी- सासवड- फुरसुंगी असा पुढे जाणार आहे.
या संपूर्ण दौऱ्याचा केंद्रबिंदू चिमणगाव येथील शेतकरी संवाद मेळावा असणार आहे. या दौऱ्यात किरीट सोमैय्या जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात काय भूमिका जाहीर करणार हा राजकीय औत्सुक्याचा विषय आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी झालेल्या खटाव दौऱ्यात जरंडेश्वरच्या संदर्भातील प्रश्नावर राजकीय भाष्य करायचे कटाक्षाने टाळले. मला त्या विषयावर बोलाययेच नाही, असे म्हणत अजितदादांनी आणखी चर्चा होणार नाही याची दक्षता घेतली. मात्र, येत्या दोन दिवसांत होणारा साताऱ्याचा सोमैय्या यांचा होणारा दौरा हा पुन्हा 'हाय व्होल्टेज ड्रामा' होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.