माझी वसुंधरा अभियानातंर्गत सांगली महापालिका राबविणार ग्रीन दिवाळी फेस्टिवल..
सांगली : माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रीन दिवाळी फेस्टिवल राबविणार आहे. या फेस्टिवलअंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबविण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांकडून ई शपथ घेतली जाणार आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मनपा क्षेत्रात 40 नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात मनपाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके , आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्यासह मनपाचे सर्व सहायक आयुक्त आणि खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त कापडणीस म्हणाले की, शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी आणि दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी सांगली महापालिकेकडून यंदाच्या दिवाळीत ग्रीन दिवाळी फेस्टिवल मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये राबविले जाणार आहे.
या फेस्टिवलमध्ये महापालिकेकडून नेमण्यात आलेले 40 नोडल ऑफिसर हे शाळांमध्ये जाऊन माझी वसुंधरा अभियानाची माहिती सर्वाना देणार आहेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीबाबत जागृती करणार आहेत. याचबरोबर शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून ई शपथही घेतली जाणार आहे. महापालिकेच्या या ग्रीन दिवाळी फेस्टिवलच्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती केली जाणार असून यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी येणारी दिवाळी ही फटाकेमुक्त दिवाळी म्हणून साजरी करून वायू प्रदूषण रोखण्यास सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी या बैठकीत केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.