दि सांगली ट्रेडर्स को. ऑप. क्रेडिट सोसायटीस सन २०१९-२०२० चा राज्यस्तरीय सहकार क्षेत्रातील मानाचा "दीपस्तंभ" पुरस्कार प्रदान सुरेश पाटील
सांगली : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई तर्फे सन २०१९-२०२० मधील राज्यस्तरीय १० कोटी ते ५० कोटी या गटातुन दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय "दीपस्तंभ पुरस्कार दि सांगली ट्रेडर्स को ऑप क्रेडिट सोसायटी सांगली यांना गुरुवार दिनांक ३०.०९.२०२६ रोजी शिर्डी येथे राज्य सहकार परिषदेचे राज्यमंत्री दर्जा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या शुभहस्ते व बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला, अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी दिली. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन जयंतीलाल ओस्तवाल, ऑन सेक्रेटरी राजेंद्र पाटील व मॅनेजर पायगोंडा पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
पतसंस्था फेडरेशनचे संस्था अध्यक्ष काका कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, राज्य महिला उद्योग विकास परिषद अध्यक्षा सौ. राजश्री ताई पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील, व्हा. चेअरमन जयंतीलाल ओस्तवाल, ऑन सेक्रेटरी राजेंद्र पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी सुरेश पाटील म्हणाले, पतसंस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्काराच्या मानांकनासाठी संस्थेमार्फत आवश्यक असणारी प्रश्नावली फेडरेशनतर्फे मागविली जाते. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन ही राज्यातील १६ हजार पतसंस्थांची शिखर संस्था असून या संपूर्ण पतसंस्थेच्या अडी-अडचणी आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. महाराष्ट्रातील विविध सहकारी संस्थांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांची तज्ञ परीक्षण समितीतर्फे निवड केली जाते. कोरोनाच्या या आव्हानात्मक काळातही संस्थेने सभासदांना, ठेवीदारांना व सर्व खातेदारांना आवश्यक ती सेवा पुरविली आहे. वेळप्रसंगी संस्थेने कोरोना कालावधीत ग्राहकांना घरपोच सेवा दिली आहे. संस्थेच्या ठेवींची सातत्याने झालेली वाढ केलेली १०० टक्के कर्जवसुली, ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा, आदर्श रेषीचे प्रमाण यामुळे हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार गणला जातो.
संस्थेला मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या प्रगतीला अधिक प्रोत्साहीत करणारा आहे. संस्थेवर विश्वास ठेवून गुंतवणुक करणारे संस्थेचे ठेवीदार, नियमित परतफेड करणारे कर्जदार, संस्थेचे सर्व सभासद तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे योगदान मोठे आहे. तसेच सातत्याने सामाजिक क्षेत्रातही संस्था सातत्याने कार्यरत असते. ही पतसंस्था २९ वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था असून प्रथम वर्षापासून सातत्याने 'अ' वर्ग यांना मिळालेला आहे. आज पर्यंत दीपस्तंभ पुरस्कार, बैंको पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित केले गेले आहे. या पतसंस्थेच्या ठेवी ६१ कोटी रुपये असून ४१ कोटी रुपये निधी वाटप केलेला आहे. या पतसंस्थेची स्वमालकीची मार्केट यार्ड व नेमीनाथनगर सांगली ठिकाणी वास्तू असून त्याठिकाणी लॉकर्स सुविधा ही सभासदांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. १२५० हून अधिक सभासद या पतसंस्थेचे असून नुकतीच या पतसंस्थेने मालगाव या ठिकाणी ३ एकर जागा खरेदी केलेली आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी प्री-कुलिंग युनिट, कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊस यासारख्या सुविधा सभासद आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या पतसंस्थेची स्वनिधी व रिझर्व्ह फंड ७ कोटी ४० लाख आहे..
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले सांगली ट्रेडर्स ने ग्राहकांचा विश्वास व्यक्त करून उत्कृष्ट कार्य केले आहे. पतसंस्था या सर्वसामान्यांच्या साठी उपयोगी पडत असतात मोठ्या बँका या गरिबांच्या साठी सर्वसामान्यांच्या साठी फारशा उपयोगी नसतात. त्यामुळे पतसंस्था चळवळही वाढीस लागली पाहिजे. पतसंस्था या संपूर्ण देशातल्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून तसेच गरिबातल्या गरीब लहानातल्या लहान घटकांना सेवा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान देतात. त्यामध्ये केलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे त्यांनी मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही पतसंस्था चळवळीला सहकार्य करण्याचे व पतसंस्थांच्या ठेवीदारांना विमा संरक्षण देण्यासाठी त्यांनी सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले. सांगली ट्रेडर्स ने कार्यक्षमतेच्या जोरावर हा पुरस्कार मिळवला असून भविष्यामध्ये यांना फार मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. आपला व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टिकोनातून इतरही साधनं निर्माण केली पाहिजेत की ज्याच्यामुळे लोकांची समाजाची सेवा होईल आणि पतसंस्थेचा ही विकास होण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी पतसंस्थांनी समाज आणि शेतकऱ्यांच्या साठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे वेअरहाऊस कोल्ड स्टोरेज गोडाऊन प्री-कुलिंग युनिट असे उपलब्ध तयार करून लवकर दिल्या तर त्याचा उपयोग होऊ शकतो. बुलढाणा अर्बन गेल्या वीस वर्षांमध्ये 465 गोडाऊनची शृंखला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली असल्याचे त्यांनी सांगितलं.
पतसंस्था फेडरेशन चे संस्था अध्यक्ष काका कोयटे यांनी पतसंस्थांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचे एक उत्तम मार्ग आहे असे मत व्यक्त केले. संस्थेकडे वीज बील भरणा केंद्र, लॉकर सुविधा, SMS सुविधा NEFT. RTGS सुविधा या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. संस्थेच्या सांगलीतील नेमिनाथनगर राजमती भवन समोर या ठिकाणी आत्याधुनिक साधन सुविधेसह शाखा स्थापन करण्यात आली आहे. संस्थेस प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.