Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझी शाळा आदर्श शाळा अभियान महत्वपूर्ण कामगिरी बजावेल पुढील काळात दर्जेदार व उच्च शिक्षित पिढी घडेल - पालकमंत्री जयंत पाटील

माझी शाळा आदर्श शाळा अभियान महत्वपूर्ण कामगिरी बजावेल पुढील काळात दर्जेदार व उच्च शिक्षित पिढी घडेल - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 08,  : महाराष्ट्रात माध्यमिक व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात सांगली जिल्हा गुणवत्तापूर्ण कामगिरी करेल. गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचेल तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेले ‘माझी शाळा आदर्श शाळा’ अभियान महत्वपूर्ण कामगिरी बजावून पुढील काळात एक उत्तम दर्जेदार व उच्ा्ले शिक्षित पिढी घडेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत शिक्षक स्व-सक्षमता कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षण सभापती आशा पाटील, समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, शरद लाड व संजय पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, डाएट चे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हातील विशेषत: ग्रामीण भागात आरोग्याबरोबरच भौतिक सुविधा व दर्जेदार शिक्षण यावर शासनाने भर दिला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडावा यासाठी त्याला तितक्याच ताकदीचे शिक्षण पुरविणे ही काळाची गरज झाली आहे. आरोग्य व शिक्षण या सेवा दर्जेदार मिळाल्या तर पुढील पिढी दर्जेदार व सक्षमच घडेल. सध्याच्या काळात खाजगी शाळांचे प्रमाण वाढत आहे कारण त्या ठिकाणी दर्जेदार भौतिक सुविधांबरोबरच उच्च पध्दतीचे शिक्षण विद्यार्थ्याला मिळत आहे. त्याच धर्तीवर किंबहुना त्याहून अधिक दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळातून मिळू लागले तर जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचाही ओघ वाढेल. यासाठीच सांगली जिल्ह्यात 141 शाळा ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत मॉडेल स्कूल म्हणून विकसीत करण्यात येत आहेत. या 141 शाळा पूर्ण विकसीत झाल्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी शिक्षकानाही तितक्याच पध्दतीने प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज ओळखून  शिक्षक स्व-सक्षमता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शिक्षकानीही आपले संपूर्ण योगदान देवून पुढील उत्तम व गुणवत्तापूर्ण पिढी घडविण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच जिल्ह्यात रेशनकार्ड मोहिम, पुनर्वसन प्रलंबित प्रकरणे निपटारा मोहिम तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांबाबत मोहिमा सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम भरीव कामगिरी बजावेल. यामुळे सांगली जिल्ह्याचा लौकीक महाराष्ट्रात होईल असा विश्वास व्यक्त करून या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य या उपक्रमास दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्हा परिषद सांगलीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी काम करीत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती सुधारावी, दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी माझी शाळा आदर्श शाळा अभियानाची सुरूवात डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची लाट ओसरली असून आता हे अभियान गती घेईल. पुढील काही दिवसात सांगली जिल्ह्यामध्ये या अभियानाच्या माध्यमातून शिक्षणात क्रांती घडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या अभियानासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीच्या 13 टक्के निधी या उपक्रमासाठी राखीव ठेवला आहे. यापूर्वी शिक्षणासाठी हा निधी 2 टक्के इतका होता. त्यामुळे आता यासाठी भरीव निधी उपलब्ध होईल, असे सांगून यावेळी माझी शाळा व आदर्श शाळा उपक्रमाचे सविस्तर सादरीकरण त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण सभापती आशा पाटील यांनी केले. समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. आभार प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.