अन्न व औषध प्रशासनातर्फे दोन लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त
सांगली, दि. 25,: सणासुदीच्या अनुषंगाने खाद्यतेलातील भेसळीवर नियंत्रण राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे माधवनगर रोड सांगली येथील मे. ओम सेल्स कार्पोरेशन या पेढीतील 1 लाख 70 हजार 185 रूपये किंमतीचा व एमआयडीसी कुपवाड येथील मे. भाग्योदय सेल्स कार्पोरेशन या पेढीतील 61 हजार 950 रूपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे पालन होत नसल्याने जप्त केला. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
मे. ओम सेल्स कार्पोरेशन पेढीत विक्रीस साठविलेल्या जिओ ॲक्टीव या ब्रँडच्या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेवून उर्वरित 1 लाख 70 हजार 185 रूपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. हे खाद्यतेल 1 लिटर पाउच स्वरूपात असून त्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तुरतुदी प्रमाणे लेबल नसल्याचे आढळून आले. हे खाद्यतेल कर्नाटकातून मागविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मे. भाग्योदय सेल्स कार्पोरेशन या पेढीत विक्रीसाठी त्यांनी स्वत: पॅकिंग केलेले हिरा ब्रँड रि. पामोलिन तेल/खोबरेल ते/रि. सोयाबिन तेल यांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित रि. पामोलिन तेल /खोबरेल तेलाचा 61 हजार 950 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. या पेढीमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे पालन होत नसल्याने खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. अन्न नमुन्यांचे प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न्) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. केदार, श्रीमती फावडे, श्रीमती पवार यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.