Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पूरग्रस्तांना महाआघाडी सरकारची भरीव मदत; योग्य नियोजनामुळे मोठे संकट टळले भाजपचा चक्काजाम राजकीय हेतूने प्रेरित पृथ्वीराज पाटील यांचा आरोप

पूरग्रस्तांना महाआघाडी सरकारची भरीव मदत; योग्य नियोजनामुळे मोठे संकट टळले भाजपचा चक्काजाम राजकीय हेतूने प्रेरित पृथ्वीराज पाटील यांचा आरोप



सांगली, दि. २४ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यंदाच्या महापुरात नुकसान झालेल्यांसाठी तातडीने भरीव मदत केली आहे, याशिवाय महापुराचे योग्य नियोजन केल्यामुळे मोठी हानीही टळली आहे. असे असतानाही भाजपाचे नेते चक्काजाम आंदोलन करत आहेत. त्यांचे हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आरोप काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने यंदा महापुराबाबत आधीच गांभीर्याने दखल घेतली होती. नद्यांचे पाणी वाढू नये यासाठी धरणांतील पाण्याचे योग्य नियोजन केले होते. कर्नाटकातील आलमट्टी धरणाचे पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार त्या राज्यानेही पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले होते. या सर्व  नियोजनामुळेच कृष्णा, वारणा व अन्य नद्यांचे पाणी लवकर ओसरले. त्यामुळे मोठे संकट टळले. सांगली शहर आणि आसपासच्या गावांत पाणी येऊ नये आणि आले तर लोकांना जास्त हानी पोहचू नये, यासाठी त्यांना वेळीच बाहेर जायच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ज्यांचे स्थलांतर केले, त्यांच्या राहण्याची जेवण्याची आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली.

ते म्हणाले, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महापुराच्या काळात सांगली शहराचा तातडीने दौरा केला होता तसेच लगेच मदत देण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केला.  त्यांनीही लोकांच्या पाठीशी राहणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सातत्याने पुराची दखल घेत होते, अहोरात्र मदत कार्य करत होते.

ते म्हणाले, २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्यावेळी तेव्हाचे मुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर खूपच उशिरा आले होते आणि आल्यानंतरही सेल्फी काढण्यात मग्न झाले होते. नुकसानीबाबत किंवा मदत कार्याबाबत त्यांनी अजिबात दखल घेतली नव्हती. त्यामुळे सांगलीवाडीतील लोकांचा रोष त्यांना या दौऱ्यात बघावा लागला होता. त्यावर्षी कुठलेच नियोजन नसल्यामुळे महापुराचे गांभीर्य खूपच वाढले होते,  तसेच लोकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी महाआघाडीच्या नेत्यांनी अचुक नियोजन केल्यामुळेच पुराचे गांभीर्य कमी झाले होते. हे भाजपच्या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण आणि शहरी हा फरक न करता सरसकट मदत केली आहे. आधीच्या सरकारसारखा फरक केला नाही. जे लोक स्थलांतरित झाले, त्यांना त्यावेळी मदत मिळाली नव्हती, पण यावेळी स्थलांतरीत झालेल्यांना दहा हजार रुपयांची मदत केली आहे. टपरीधारकांनीही त्यांनी मदत केली नव्हती. यावेळी  टपरीधारकांना दहा हजार रुपये देण्यात आले.  ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सगळ्यांचा महाआघाडी सरकारने विचार केला आहे. तरीही खोटे चेक दाखवून भाजपचे नेते लोकांची फसवणूक करत आहेत. महाआघाडी सरकारने चेक न देता मदतीची रक्कम थेट लोकांच्या बँक खात्यावर जमा केली आहे, त्यामुळे भाजप नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे.

ते म्हणाले,  ग्रामीण भागात २०१९ मधील पुराच्या वेळी पाच हजार रुपये दिले होते, तर महाआघाडी सरकारने यंदा दहा हजार रुपये दिले आहेत. घराची पडझड झालेल्यांना त्यांनी ९५ हजार, शंभर रुपये दिले होते तर आताच्या सरकारने एक लाख पन्नास हजार रुपयांची भरपाई दिली आहे. त्यानंतर कमी-जास्त पडझड झालेल्या घरांची भरपाई सुद्धा दिली आहे.

सर्व बाबतीत हा फरक आहे. तरी भाजपने आक्रस्ताळेपणा सुरू केला आहे तो लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.