Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांची पाठ फिरताच विखे पाटील यांच्या लोणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

 शरद पवारांची पाठ फिरताच विखे पाटील यांच्या लोणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट



नगर : अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोणी खुर्दला गुरुवारी भेट दिल्यानंतर लगेचच या सदस्यांनी पक्ष सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोणी खुर्द ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळात प्रवेश केला आहे. त्यामुळे सरपंच जनार्दन घोगरे यांची सत्ता अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोणी खुर्दमध्ये भेट दिली होती. घोगरे यांना 'कामाला लागा' असा संदेशही त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची पाठ फिरताच चार सदस्यांनी घोगरे यांची साथ सोडल्याचे पहायला मिळाले. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना लाज वाटायला हवी ; किरीट सोमय्यांचा जोरदार हल्ला

सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या गावात विखे यांच्या मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव घोगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने तेथे विजय मिळविला होती. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी ११ जागा जिंकून त्यांनी विखे यांच्या गटाकडून सत्ता खेचून आणली होती. विखे समर्थकांना या अवघ्या ६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर जनार्दन घोगरे पाटील सरपंच झाले आहेत. हा पराभव विखे यांच्या जिव्हारी लागला होता.


आता मात्र तेथे पुन्हा राजकीय घडामोडी घडल्या. शनिवारी सत्ताधारी परिवर्तन मंडळाचे सदस्य शरद आहेर, संगीता तुपे, प्रदीप ब्राह्मणे व मायकल ब्राह्मणे यांनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनसेवा मंडळात प्रवेश केला. आता सत्ताधारी परिवर्तन मंडळाकडे अवघे ६ सदस्य उरले आहेत, तर विरोधी सदस्यांची संख्या १० झाली आहे. एक जागा रिक्त आहे. आता पुढे काय घडामोडी होणार, सत्ता परिवर्तनाची प्रक्रिया कशी असेल, यासंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत.

गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभासाठी आले होते. त्यावेळी परत जाताना ते लोणी खुर्दमध्ये थांबले होते. घोगरे पाटील जुन्या काळापासून पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी पवार यांचे गावात जंगी स्वागत केले. पवारांनी तो सत्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी घोगरे यांच्यासह कार्यकर्त्यांना 'कामाला लागा', असा संदेश दिल्याची चर्चा सुरू आहे. त्याला दोनच दिवस उलटताच ना तो ही नवीन राजकीय घडामोड गावात घडली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.