भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; नरेंद्र मोदी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत,'
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. त्यातच आता आणखी एका मंत्र्याने भर घातली आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचे मंत्री उपेंद्र तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना त्यांची तुलना चक्क देवाशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हरदोई येथील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 'नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत,' असे ते म्हणाले आहेत. 'नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत,' असे उपेंद्र तिवारी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.
नुकतंच उत्तर प्रदेशातील 'या' भाजपा नेत्याने वाढत्या इंधनदारावर बोलताना देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही असे अजब विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. 'भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही,' असे वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केले.
'सरकारने करोनाच्या लसी आणि करोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली तर इंधनाचे दर फार कमी आहेत,' असा युक्तीवाद तिवारी यांनी केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.