प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात; मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होत्या
उत्तर प्रदेश पोलिसांनी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. तर काँग्रेसने दावा केला आहे की, त्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ शेतकरी, ३ भाजप कार्यकर्ते आणि १ भाजप नेत्याचा ड्रायव्हर आहे. दरम्यान, लखीमपूर खेरी प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशचे राजकारण तापलं असून विविध पक्षांचे नेते लखीमपूर खेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रियंका गांधी रविवारी रात्री लखनऊहून लखीमपूर खेरीला रवाना झाल्या. प्रियंका गांधी यांचा ताफा पोलिसांना चकमा देऊन लखीमपूर खेरीकडे निघाला होता. नंतर पोलिसांनी प्रियंका गांधी यांना सीतापूरमधील हरगाव येथून ताब्यात घेतलं असून त्यांना पोलीस लाईनमध्ये नेण्यात आलं. यासोबतच काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
प्रियंका गांधींना अटक; काँग्रेसचा दावा
दरम्यान, यूपी काँग्रेसने दावा केला की, 'प्रियांका गांधींना हरगाव येथून अटक करून सीतापूर पोलीस लाईनमध्ये नेले जात आहे, कृपया सर्वांनी पोहोचा.' त्याचवेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी ट्वीट करून म्हटले की, 'शेवटी जे घडले, ते भाजपकडून अपेक्षित होते. 'महात्मा गांधीं' च्या लोकशाही देशात, 'गोडसे' च्या उपासकांनी मुसळधार पाऊस आणि पोलीस दलाशी लढत अन्नदात्यांना भेटायला जात असलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगावातून अटक केली. ही फक्त लढ्याची सुरुवात आहे !! किसान एकता जिंदाबाद.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेतली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री लखीमपूर खेरी प्रकरणाबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यूपीचे डीजीपी आणि अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थीही बैठकीला उपस्थित होते. योगी यांनी हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त करणारे निवेदन जारी केलं आहे. चौकशी होईल आणि दोषींना सोडलं जाणार नाही, असं योगी आदित्यानाथ म्हणाले. मुख्यमंत्री योगी यांनी लोकांना कोणत्याही भ्रमात न पडण्याचे आवाहन केलं आहे. हिंसाचारानंतर लखीमपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद झाल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तो फेटाळला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.