Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवाब मलिक; "त्या' ड्रग्स पार्टीतील भाजप नेत्याच्या मेव्हण्याला का सोडले?

 नवाब मलिक; "त्या' ड्रग्स पार्टीतील भाजप नेत्याच्या मेव्हण्याला का सोडले?


मुंबई: क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता. त्याची मी उद्या पोलखोल करणार आहेच, असं सांगतानाच भाजप नेत्याच्या मेव्हण्याला एनसीबीने का सोडले?; असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक उद्या एनसीबीच्या रेडवरून अनेक गौप्यस्फोट करणार असल्याने त्यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एनसीबीला हा सवाल केला आहे. क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचं मलिक यांनी केला. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, असेही ते म्हणाले.

तो भाजप नेता कोण हे उद्या सांगणार

भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या घोषित करणार असल्याचे सांगतानाच NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना 8 ते 10 लोकांना पकडले आहे असे मीडिया बाईटमध्ये सांगितले होते. खरे तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारा एक अधिकारी अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे.

पॉलिटिकल कनेक्शन असणारा नेता सुटलाच कसा?

भाजपाचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानेच सगळं गॉसिप केले आहे. पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे. त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा? असा सवाल करतानाच NCB ला याचं उत्तर द्यावंच लागेल, असंही ते म्हणाले. काही बाहेरचे हायप्रोफाईल लोकं हे सगळं प्रकरण हँडल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

वानखेडेंची तक्रार करण्यात अर्थ नाही

समीर वानखेडेच्या बाबतीत तक्रार करण्यात अर्थ नाही. सर्व पुरावे देवून काही कारवाई होत नाही. बेकायदेशीर कामं सुरू आहेत. खरं काय आणि खोटं काय हे जनताच ठरवते, असंही त्यांनी सांगितलं.

कलाकारांकडून पैसे उकळले

कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्यसरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या. त्यामध्ये 20 किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात लागतील तसतशी यांची पोलखोल करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.