मिरज शासकीय रूग्णालयात बालरूग्णांसाठी 50 आयसीयु बेडचे कोरोना सेंटर सज्ज - पालकमंत्री जयंत पाटील 590 एल.पी. एम. क्षमतेच्या दोन पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटसचे उद्घाटन
सांगली, दि. 8, : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. तरीही संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे म्हटले जात आहे. अपेक्षा आहे की, कोरोनाची तिसरी लाट येणार नाही पण जर आलीच तर यासाठी आपण जय्य्त तयारी ठेवली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 590 एल.पी. एम. क्षमतेचे दोन पी.एस.ए. ऑक्सिजन प्लाँटस तसेच मिरज शासकीय रूग्णालयात लहान मुलांचा वॉर्ड अत्यंत सुसज्जपणे उभा करण्यात आला आहे. यामध्ये स्वतंत्रपणे जवळपास 50 बेड्सची सुविधा उभी करण्यात आली आहे. आणि केंद्र शासनाकडून मंजूर झालेले बेडस् सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथील 590 एल.पी. एम. क्षमतेचे दोन पी.एस.ए. ऑक्सिजन प्लाँटचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. तसेच लहान मुलांसाठी उभारलेल्या कोरोना वॉर्डची पहाणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यंवशी, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. रूपेश शिंदे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिशीर मिरगुंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, इलेक्ट्रिशन विभागाचे शितल शहा आदि उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोरोना वॉर्डमध्ये 36 व्हेंटीलेटर्सची सोय असून हा वॉर्ड सर्व आरोग्य उपकरणांनी सज्ज आहे. येणाऱ्या संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित झाली तर त्यांच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथील बालरूग्ण विभागात 50 आयसीयु बेडचे लहान मुलांसाठी कोरोना सेंटर सज्ज करण्यात आले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येवू नये यासाठी प्रयत्नशील आहोतच पण जर आली तरी त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. या अंतर्गतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे 21 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टॅंक कार्यान्वित झाला आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे तीन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहेत. यामध्ये प्रत्येकी 125 जम्बो सिलेंडर प्रतिदिन भरणारे दोन प्लांट आहेत. तर उर्वरित प्लांट मधून साधारणतः 250 जम्बो सिलेंडर्स प्रतिदिन भरण्यात येणार आहेत. असे एकूण 500 जम्बो सिलेंडर्स प्रतिदिन ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविल्या आहेत. हे प्लांट हवेतून ऑक्सिजन जनरेट करणारे आहेत. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आवश्यक असणाऱ्या सर्व वॉर्डना योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा करणे सोयीस्कर होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.