Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही..

 ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही..


मुंबई: मनी लॉड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळाले. ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.

अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव नसल्याची माहिती समोर येत असून, अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचे कारण ईडीकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.

देशमुखांच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीने सीबीआयकडे मदत मागितली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.