अनिल देशमुखांना धक्का, वकिलाला CBI कडून अटक, अहवालात अधिकाऱ्यामार्फत फेरफार केल्याचा आरोप
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणामध्ये बुधवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. अनिल देशमुख प्रकरणातील प्राथमिक अहवालात सीबीआयच्या अधिकाऱ्यामार्फत फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना आता सीबीआय दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी सीबीआयमधील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन सीबीआयच्या प्राथमिक अहवालात फेरफार केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने त्यांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिल्याचा अहवाल २९ ऑगस्टला समोर आला होता. या अहवालात छेडछाड केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरु केली होती. दरम्यान, सीबीआय आज आनंद डागा यांना मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करणार असून न्यायालयाकडे सीबीआय कोठडीची मागणी करुन त्यांना दिल्लीत घेऊन जाणार आहेत.
CBI ने आपल्याच अधिकाऱ्याला केली अटक
सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणात चौकशी करत असलेल्या आपल्याच अधिकाऱ्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अनिल देशमुख प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.