रावसाहेब दानवेंनी भर सभेत मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठिंबा मागितला, उद्धव ठाकरेंनी शब्दच दिला!
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी रावसाहेब दानवेंच्या आवाहनावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात दानवेंना एक शब्द दिला आहे. त्यामुळे दानवेंच्या मागणीला आता राज्य सरकार देखील पाठिंबा देणार असल्याचं निश्चित झालं आहे.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे प्रयत्न करत आहेत. तसं त्यांनी आजच्या भाषणातही बोलून दाखवलं. त्यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी दानवेंना पाठिंबा दिला. "रावसाहेब दानवेंना शब्द देतो. तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठिंबा देतो", असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर रावसाहेब दानवेंच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. तर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री महोदय तुम्ही पाठिशी उभं राहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पाठिंबा जाहीर करुन टाकला. "मराठवाड्यात आपण भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करत आपण भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही. तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. लोकांची कामं होणं महत्त्वाचं", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
माझ्या राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा जर बुलेट ट्रेनचा मार्ग होणार असेल तर मी तुमच्यासोबत आहे. रावसाहेब तुम्ही प्रेझेंटेशन दिलं नाही तरी चालेल, आम्ही तुमच्या पाठिशी उभं राहू, असा शब्दच मुख्यमंत्र्यांनी दानवेंना दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.