Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी जिल्ह्यात आज महालसीकरण अभियान -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी  जिल्ह्यात आज महालसीकरण अभियान -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी




- जिल्ह्यासाठी 1 लाख 70 हजार कोरोना लसीचे डोस प्राप्त

- अभियानांतर्गत जिल्ह्यात 600 सेंटर्सव्दारे 1 लाख 50 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन 

- लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण


सांगली, दि. 14,  : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी आणि जर आलीच तर तिचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सुमारे 1 लाख 50 हजार इतके कोरोना लसीचे डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात महालसीकरण अभियान तयारी आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महालसीकरण अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात 600 लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात 194 लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागात 350, शहरी भागात 56 लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, जत यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आवश्यकतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविण्यात यावीत. लसीकरणाठी आवश्यक असणारा सर्व स्टाफ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आशा वर्कर्स, एनएनएम, जीएनएम, नर्सेस, वैद्यकिय अधिकारी, लसटोचक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना योग्य त्या सूचना संबंधित यंत्रणेव्दारे देण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 लाख 70 हजार इतके डोसेस उपलब्ध असून महाअभियानांतर्गत 1 लाख 50 हजार डोसेस देण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. 

जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीकरण व्हावे यासाठी महालसीकरण अभियान आयोजित केले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाच्या ठिकाणी दिव्यांग, वयोवृध्दांना लस मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने वाहतूकीची सोय करावी, असे आदेशीत करून  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्थानिक स्तरावर लसीकरणाबाबत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. लसीकरण सुलभ पध्दतीने व्हावे यासाठी लसीकरण सेंटर्सवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना शासकीय यंत्रणेने विश्वासात घेवून काम करावे. यासाठी स्थानिक प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे. लसीकरणाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने आवश्यक असणारी साधनसामग्री तातडीने खरेदी करावी. त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लसीकरण केंद्रावर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून अधिकच्या सुरक्षिततेसाठी एनएसएस, एनसीसी यांची प्रसंगानुरूप मदत घेण्यात यावी. लसीकरण महाअभियान यशस्वी करण्यासाठी सर्वच घटकांनी समन्वयाने व युध्दपातळीवर काम करून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन करून या अभियानात सहभागी असलेल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, लसीकरण महाअभियानासाठी जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून आवश्यक असलेल्या ठिकाणी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या गावांची लोकसंख्या मोठी आहे किंवा आवश्यक असणाऱ्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी खाजगी हॉस्पीटल्सच्या स्टाफचीही मदत घेण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपले परिपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात 194 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास ती आणखी वाढविण्यात येतील. महापालिका क्षेत्रात भाजीपाला विक्री करणारे, फेरीवाले, बांधकाम कामगार यांच्या लसीकरणाचीही सोय करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, क्रिडाई, विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था यांच्याबरोबर बैठक घेवून योग्य ते नियोजन केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.