कृष्णा नागरचे सुवर्णपदक..
टोकियो : टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवला आहे. बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं असून स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यानं हॉन्गकॉन्गच्या चू मान कायचा 2-1 असा पराभव केला. याआधी पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदक मिळविले होते.
स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत कृष्णा नागर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कृष्णा नागरने अंतिम सामन्यात शेवटचा तिसरा सेट जिंकत कृष्णानं भारताला पाचवं सुवर्णपदक जिंकून देत इतिहास रचला. यासोबत भारताच्या पदकसंख्येने 19 हा विक्रमी आकडा गाठला आहे. कृष्णा नागरच्या विजयासोबतच भारताच्या खात्यात 5 सुवर्णपदकं, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश झाला आहे.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताकडे आता एकूण 19 पदके आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रविवारी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.
ध्वजवाहकाचा मान अवनी लेखराकडे
पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोह सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. या समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा हिला मिळाला आहे. 19 वर्षीय पॅरालिम्पिक शूटर अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एयर रायफल एसएच 1 या स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं. तसेच नंतर एका कांस्य पदकावरही नाव कोरलं होतं. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी अवनी लेखरा ही पहिलीच खेळाडू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.