एनटीएकडून नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नवं वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संदर्भातील नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
परीक्षेच्या तारखा का बदलण्यात आल्या?
10 ऑक्टोबरला इतर परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी ही बाब एनटीएच्या लक्षात आणून दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यानंतर यूजीसी नेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
अर्ज करण्याची आणखी एक संधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून यापूर्वी नेट परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी 6 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. तर, 7 ते 12 सप्टेंबर दरम्यान अर्जामध्ये दुरुस्तीची विंडो सुरू राहील.कोरोना विषाणू संसर्गामुळे डिसेंबर 2020 ची परीक्षा उशिरा होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं डिसेंबर 2020 आणि जून 2021या दोन्ही परीक्षा जोडून एकत्र घेण्याचा निर्णय घेतला होता.
कोरोनामुळं परीक्षा लांबणीवर
देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षेचे आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. नेट परीक्षा मे महिन्यामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ते 17 मे दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.
नेट परीक्षेचा पॅटर्न
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन करते. परीक्षेला दोन पेपर आयोजित केले जातात. पहिला पेपर हा सर्व विषयांसाठी सारखा असतो तर दुसरा विषयावर आधारित असतो. जवळपास 84 विषयांसाठी परीक्षेचे आयोजन केले जातं. या परीक्षेसाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. नेट परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग केले जात नाही. दोन्ही पेपर मिळून 150 प्रश्न विचारले जातात त्यापैकी यूजीसी आणि एनटीए निश्चित केलेले गुण मिळाल्यास उमेदवाराला उत्तीर्ण जाहीर केले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये अध्यापन करण्याची संधी मिळते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.