Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा

 आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा


मुंबई : राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावेळी, कोविडच्या निर्बंधांवरुनही सरकारला लक्ष्य केलं.

सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. केंद्र सरकारनेही दहीहंडी आणि गणेशोत्सव सणांसाठी निर्बंध लागू केल्यासंदर्भात पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकाराचं, असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर गंभीर आरोप केले आहेत. नुसतं त्या कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार, अशी भीती दाखवली जाते. हे कुठपर्यंत चालणार? असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुकांवरुनही सरकारवर टीकास्त्र

"राज्य सरकारलाच निवडणुका नको आहेत. निवडणूक घेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे", असं राज ठाकरे म्हणाले.


ओबीसी जनगणना करा आणि निवडणुका घ्या

ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरं असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. ओबीसींची जनगणना करुन निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही, असंही ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.