किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री; घराभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय.
किती दिवस डांबून ठेवणार, घोटाळे बाहेर काढणारच
'हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,' अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
मला अडवलं तरी मी कोल्हापूरला जाणार
राज्य सरकारने माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. माला कोल्हापूरला जाऊ दिले जात नाहीये, असा दावा केलाय. तसेच मला कोणीही कितीही अडवले तरी कोल्हापूरला जाणारच असं ठामपणे सांगितलं आहे. हसन मुश्रीफ हादरले आहेत. मुश्रीफ यांनी भ्रष्टाचाराचे 98 कोटी रुपये आपल्या संस्थेत तसेच कारखान्यात गुंतवले आहेत. मी उद्याच कोल्हापुरात जाऊन कारखान्याची पाहणी करणार होतो. पण त्यांनी कोल्हापूरला 144 लावली. त्यानंतर ठाकरे यांनी माझा दौरा प्रतिबंधित केला आहे. तसेच वळसे पाटील यांनीही माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. पण हे घोटाळेबाज सरकार आहे. काही झाले तरी मी कोल्हापूरला जाणारच, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सोमय्या यांना स्थानबद्ध केलं, राज्य सरकारचा निषेध- फडणवीस
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकाऊन सांगितलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.