गॅसदरवाढीचा राष्ट्रवादीकडून अनोखा निषेध
पुणे : गॅस सिलेंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने पुण्यात अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या. सिटी पोस्ट येथे हे आंदोलन केले.
महागाईचे प्रतिक म्हणून या गोवऱ्या पाठवल्याचे राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, शहराध्यक्षा मृणालिणी वाणी, विधानसभा अध्यक्ष अनिता पवार, पूनम पाटील, भावना पाटील, मीना पवार, नीता गलांडे, ज्योती सुर्यवंशी, श्वेता होनराव, शहर उपाध्यक्ष सुनिता डांगे, प्राजक्ता जाधव आदी उपस्थित होत्या.
चाकणकर म्हणाल्या, महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्वला गॅस योजना आणली. परंतु, फक्त योजना आणून पोट भरत नसतं. दर 15 दिवसांनी स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर वाढतोय.
त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा चुलीकडे चला अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हा निषेध करण्यात आला असून शासनाने तातडीने ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.