सांगलीत सापडला साडेनऊशे वर्षांपूर्वीचा जैन शिलालेख
सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथे चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील इसवी सन १०७७ सालचा जैन शिलालेख सापडला आहे. महामंडलेश्वर जोगम कलचुरी याने अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोध्दार करताना हा दानलेख लिहून ठेवला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. महेंद्र बाळकोटगी यांनी याचे वाचन केले. पलूस तालुक्याचा समावेश त्यावेळी कराड प्रांतात होता, हे या शिलालेखातून स्पष्ट होते. जोगम कलचुरीचा हा महाराष्ट्रातील पहिला शिलालेख आहे. या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्याचा मांडलिक असलेल्या जोगम कलचुरी याने अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोध्दार सुरु केला. त्यासाठी ९ एप्रिल १०७७ रोजी हा दान लेख लिहून ठेवला.
या शिलालेखावर मध्यभागी पद्मप्रभ तीर्थंकरांची प्रतिमा, बाजूला गाय-वासरू आणि सुर्य चंद्राचे शिल्पांकन आहे. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला. महेंद्र बाळकोटगी यांनी या लेखाचे वाचन करून दिले. या शिलालेखात एकूण ६१ ओळी आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.