नागपूर शिवेसना पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक, संपर्कप्रमुखांविरोधात शिवसैनिकांची नाराजी, कृपाल तुमानेंसह आशिष जैस्वालांवर नवी जबाबदारी
नागपूर: महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेमध्ये नागपूर जिल्ह्यामधील आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. नुकतेच शिवसेनेचे नागपूरचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची मुंबईला एक बैठक झाल्याचं कळतंय. यामध्ये नागपूरमधील शिवसेनेत एककल्ली कारभार सुरु असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
मुंबईत खासदार अनिल देसाई यांच्या सोबत बैठक
नागपुरातील शिवसेनेत एककल्ली कारभार असल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे. 'संपर्कर्प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यप्रणालीवर शिवसैनिकांची नाराजी' असल्याचं समोर आलं आहे.नागपूरमधील शिवसेनेच्या कामकाजासंदर्भात मुंबईतील शिवालय खासदार अनिल देसाई यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत नागपुरातील शिवसैनिकांनी चतुर्वेदी यांच्यावर आरोप केल्याची माहिती आहे.
NIT विश्वस्त नेमण्यावरुन आमदारांमध्ये मतभेद
नागपूर येथील NIT या संस्थेत विश्वस्त नेमण्यावरुन सेनेतील दोन आमदार आमनेसामने आल्याचं देखील कळतंय. संदिप इटकीलवार यांच्या नावाला आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.
शहर संघटेनत लक्ष घालण्याच्या सूचना
मुंबई येथील झालेल्या बैठकीत शिवसेनेकडून नागपूर शहर पक्षसंघटनेत खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जैसवाल यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शेखर सावरबांधेचा राष्ट्रवादीत प्रवेश
शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याने सेनेत स्फोट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत नागपुरातील डझनभर जुन्या शिवसैनिकांनी शिवबंधन तोडलं. मराठी माणसांच्या शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा होत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
20 वर्षे सेनेत राहिलेल्या नेत्यावर पक्ष सोडण्याची वेळ
शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती. विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती. परंतु "आपले नेते खा. गजानन किर्तीकर यांच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, मग आपण सेनेत राहून काय करायचं?" असा सवाल उपस्थित करुन त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने सेनेला मोठा धक्का बसलेला आहे.
शिवसेनेला दुसरा मोठा धक्का
दोन महिन्यात शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता शेखर सावरबांधे यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार पडलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.