राऊत म्हणतात, सोमय्यांवरील कारवाईबाबत सरकारमध्येच मतभेद?कारवाईशी सीएमओचा काही संबंध नाही!
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही कारवाई गृहमंत्रालयाने केली आहे, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी एकप्रकारे सोमय्यांवरील कारवाईचं खापर राष्ट्रवादीवर फोडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत किरीट सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नसल्याचं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जातंय त्यामागे केंद्र सरकार आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, केंद्राच्या पाठबळावर राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा विरोधी पक्षांचा उपक्रम आहे. त्याला धंदा म्हणणार नाही, असं सांगतानाच आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली आहे. ती गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्यात आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. मी सकाळी पूर्ण माहिती घेतली. गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दोन्ही बाजूने काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं म्हणून ही कारवाई झाली. त्यात मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली म्हणून त्याकडे पाहू नये. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी अशा प्रकारचे खोटेनाटे आरोप केले, बुडबुडे सोडले म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाही हे आम्हाला माहीत आहे, असं राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या कार्यालयाचा संबंध नाही
सोमय्यांनी केंद्रसरकारवर बोलावं. इतर राज्यातील भाजपची सरकारं आहेत. त्यावर बोलावं. तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे, यंत्रणा आहेत, लाचलूचपत विभाग आहे. या संस्था पक्षपात न करता काम करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांवर आरोप करत आहात. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न होत असेल तर राज्याचं गृहमंत्रालय कारवाई करत असतं. कालपासून मी पाहतो ही राज्याच्या गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. गृहमंत्रालयाला काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असं ते म्हणाले.
मंगळावर, चंद्रावर जाऊन आमच्या जमिनी शोधा
सोमय्या हे आणखी नवे जमीन घोटाळे काढणार आहेत. त्याबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावर, त्यांनी चंद्रावर जाऊन पाहावं. त्यांनी मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्या. या देशात लोकशाही आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. यापूर्वी अनेकांनी असे आरोप केले. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. विरोधी पक्ष आहे. ते आरोप करू शकतात. पण शेवटी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त गृहमंत्रालयाला कारवाई करावी लागते. त्यानुसार कारवाई झाली आहे. कुणाला केंद्राच्या इशाऱ्यावर आरोप करायचेच असेल तर त्याला आम्ही काय करणार. त्यांना आरोप करू द्या, आरोप कुणावर होत नाही. आरोप मोदींवर होतात, अमित शहांवर होतात. भाजप शासित राज्यातील नेत्यांवर होतात. सध्या राजकारणात आरोप करणं ही फॅशन झाली आहे. त्यांनी आरोप करत राहावं, असं त्यांनी सांगितलं.
आमचा रंग कोणता लवकर कळेल
शिवसेनेने भगवा सोडून हिरवा परिधान केला आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली होती. त्यावरही त्यांनी पलटवार केला. त्यांना कळेल लवकर आमचा रंग कोणता आहे. कळेल. कायदेशीर कारवाई एखाद्यावर होते. तेव्हा रंगाचा प्रश्न कुठे येतो? या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास रंग बघून कारवाई होत नाही. आमचा रंग कोणता आणि तुमचा रंग कोणता असं होत नाही. शिवसेनेवर असे आरोप करण्यापूर्वी आपले अंतरंग झाकून पाहावं, असा पलटवार त्यांनी केला.
त्यांनी भ्रमात राहू नये
केंद्रीय तपास दबाव आणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची धमकी दाखवून राज्यात काही उलथापालथ करता येईल असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. आम्ही परिस्थितीचा सामना करू. आम्ही संकटाला सामोरे जाऊ, आम्ही संघर्ष करू. हसन मुश्रीफ यांनी आव्हान स्वीकारल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. हे सरकार डरपोक नाही. आम्ही ठाकरे-पवारांच्या नेतृत्वात लढाई सुरूच ठेवू. आमच्यावर किती हल्ला करा, पाठित खंजीर खुपसा आम्ही झुकणार नाही, असं सांगतानाच केंद्रात अनेक मंत्री आहेत. त्यांच्यावर आरोप भाजपने केले होते. आज ते केंद्रात मंत्री आहेत. राज्यातही अनेक नेत्यांवर आरोप केले. त्यांना भाजपमध्ये घेतलं. ते हरिश्चंद्राची औलाद झाली. अनेकांचे नावे सांगू शकतो, असं ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.