फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवलेत, मग ही तारीख विसरु नका,
मुंबई: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. तुलनेत कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात. मात्र, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
तुम्ही बँकेत टर्म डिपॉझिट योजनेत पैसे गुंतवले असतील तर पॉलिसी कधी मॅच्युअर होणार, याकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. भारतीय रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील नियमात बदल केला होता. त्यानुसार तुम्ही मुदत ठेव योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पैसे बँकेतच ठेवले तर त्यावरील व्याजदर कमी केला होता. परिणामी संबंधित गुंतवणुकदाराला FD च्या व्याजदराऐवजी बचत खात्याच्या व्याजदरानुसार पैसे मिळतील. त्यामुळे आता गुंतवणुकदारांना आपल्या पॉलिसीचा कालावधी कधी पूर्ण होणार, याबाबत अधिक दक्ष राहावे लागेल.
फिक्स्ड डिपॉझिटचा नवा नियम?
आता मुदत ठेवीचा कालावधी उलटून गेल्यानंतरही (मॅच्युरिटी पिरीयड) पैसे काढले नाहीत तर त्यावरील व्याज कमी होईल. आतापर्यंत एखाद्या व्यक्तीने मॅच्युरिटीनंतरही फिक्स्ड डिपॉझिट मधील पैसे काढले नाही तर ती पॉलिसी रिन्यू होत असे. मात्र, नव्या नियमानुसार फिक्स्ड डिपॉझिट ची रक्कम बँकेत पडून राहिली तर त्यावर कमी व्याज देण्यात येईल. हा नियम वाणिज्यिक बँका, स्मॉल फायनान्स बँका, सहकारी बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँकांसाठी लागू असेल. या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून सात ते दहा दिवसांच्या मुदत ठेव योजनेसाठी 3.25 टक्के ते 6.75 टक्के इतके व्याज दिले जात आहे.
नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक
नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँकेकडून सात ते दहा दिवसांच्या मुदत ठेव योजनेसाठी 3 ते 7 टक्के इतके व्याज दिले जात आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेव योजनांसाठी 2.5 टक्के ते 6.75 टक्के इतके व्याज दिले जात आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेतील व्याजदर 3 टक्के ते 6.75 टक्के इतका आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.