Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित डोवा : तालिबानविरुद्धच्या रणनितीसाठी रशियाच्या सुरक्षा सल्लागारांसोबत बैठक..

 अजित डोवा : तालिबानविरुद्धच्या रणनितीसाठी रशियाच्या सुरक्षा सल्लागारांसोबत बैठक..


नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी सत्तेनंतर बदलेल्या परिस्थिवर भारत आणि रशियामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे राष्ट्रीय सल्लागार निकोले पेत्रुशेव यांच्यात विविध मुद्द्यांवर अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. निकोले पेत्रुशेव दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यात उभय देशांमध्ये अफगाणिस्तानातील परिस्थितीवर आणि पाकिस्तानच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा होणार आहे. एकाबाजूला रशियासोबत भारतीय सुरक्षा सल्लागार चर्चा करत असतानाच काल अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स देखील भारतात होते. त्यांचीही अजित डोवाल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली आहे. त्यामुळे तालिबानी मिशनसाठी अजित डोवाल जोमानं कामाला लागल्याचं बोललं जात आहे. यात भारत तालिबानी परिस्थितीसाठी 'गेम चेंजर' ठरणार का हे पाहावं लागणार आहे.

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर खास चर्चा

भारत आणि रशियात होणाऱ्या आजच्या बैठकीत डोवाल दहशतवादी संघटना लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुद्द्यावरुन चर्चा करण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तानात रशियाची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार असल्याची भारताची धारणा आहे. अफगाणिस्तानातील भूमीचा अशा दहशतवादी संघटनांकडून वापर केला जाणार नाही याची सर्वतोपरी दखल रशियाकडून घेतली जाऊ शकते. २४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर देखील चर्चा झाली होती. उभय देश एकत्रितरित्या काम करतील असं आश्वासन यावेळी देण्यात आलं. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतरच पत्रुशेव आज भारत दौऱ्यावर आले आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता आल्यामुळे पाकिस्तानकडून भारताविरोधातील दहशतवादी कारवाया वाढतील अशी शंका भारतानं उपस्थित केली आहे. आजच्या बैठकीसोबतच ब्रिक्स व्हर्च्युअल शिखर परिषदेत अफगाणिस्तान मुद्द्यावर मोदी, पुतीन आणि चीनी राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या शिखर परिषदेत अफगाणिस्तान मुद्दाच केंद्रस्थानी असेल अशी शक्यता आहे. तालिबाननं सिराजुद्दीन हक्कानी याला गृहमंत्री नियुक्त केलं आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा अमेरिकन सुरक्षा यंत्रणा एफबीआयच्या हिटलिस्टवर आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा भारत दौरा ठरेल 'गेमचेंजर'?

एका बाजूला तालिबानी दहशतवाद्यांनी नव्या सरकारची घोषणा केली तर दुसरीकडे भारतात अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएफचे प्रमुख बिन बर्न्स यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत मुख्यत्वे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि अफगाणिस्तानातील तालिबानी दहशत यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्रीय सल्लागार भारत दौऱ्यावर येण्याच्या एकदिवस आधीच अमेरिकेच्या बर्न्स यांचा भारत दौरा यामागे मोठी रणनिती आणली जात असल्याचं बोललं जात आहे. आगामी काळात अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत भारत गेमचेंजरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. यासाठी अजित डोवाल कामाला लागले आहेत असं बोललं जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.