जयंत पाटील कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसले, 3 किलोमीटर चिखल तुडवत गाठलं बिलदरी धरण
चाळीसगाव: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील चाळीगावच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांनी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून ते बिलदरी धरणाच्या दिशेने रवाना झाले. धरणाकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला होता. चिखल तुडवत हा तीन किलोमीटरचा रस्ता मोठ्या कसरतीने पार करत जयंत पाटील यांनी बिलदरी धरण गाठून धरणाची पाहणी केली.
तीन दिवसांपूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीने बिलदरी धरण ओव्हर फ्लो होऊन फुटलं होतं. त्यामुळे जयंत पाटील यांनी आज या धरणाची पाहणी केली. यावेळी अधिकारी वर्ग उपस्थित होता. आता प्रथमतः धरणाची दुरुस्ती करू, असं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.
त्या आरोपांची चौकशी करू
चाळीसगाव, कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. या सर्व नुकसानग्रस्तांना सरकारकडून मदत दिली जाईल. चाळीसगावमधील नागरिकांचे नदीवरील सुशोभिकरणा संदर्भात आरोप आहेत. त्याची चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
नदीपात्रातील बांधकामे हटवणार
पुरामुळे शेती खरवडून निघाली आहे, अनेक जनावरे वाहून गेली आहेत अशी माहिती माध्यमांना दिली. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आव्हान समोर आहे. त्याची तयारी स्थानिकांनी केली आहे असेही त्यांनी सांगितलं. चाळीसगाव परिसरात नदी पात्रात सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेल्या अतिरीक्त बांधकामामुळे ही पूरपरिस्थिती आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून त्याला प्रचंड विरोध स्थानिकांनी केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच पर्यावरणाच्या विरोधात विनापरवाना नदीपात्रात असलेले बांधकाम हटविण्याचे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचेही ते म्हणाले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नदी पात्रालगत सरंक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरीकांकडून समोर येत आहे. त्यामुळे गाव-वस्तीचे पुरापासून बचाव करण्यासाठी लवकरच सरंक्षण भिंत बांधण्याबाबत कार्यवाही करु, असे आश्वासन त्यांनी दिले. चाळीसगाव भागात अतिवृष्टीनंतर काही अफवा उठत आहेत. त्यावर जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत शासकीय यंत्रणा अधिकृत माहिती जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
औरंगाबादलाही जाणार
जयंत पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून आज चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची ते पाहणी करत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी मराठवाडा आणि खानदेशात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी दरड कोसळली होती तर बर्याच गावांमध्ये पूराचे पाणी घुसुन घरांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.