छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून तो पुढीलप्रमाणे. पुर्व पुनरिक्षण उपक्रम - दुबार / समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे इत्यादी, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देवून तपासणी / पडताळणी, योग्य प्रकारे विभाग / भाग पुन्हा तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचा कालावधी दि. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत. पुनरिक्षण उपक्रम - एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे - 1 नोव्हेंबर 2021, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021, विशेष मोहिमांचा कालावधी – दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दिवस, दावे व हरकती निकालात काढणे - 20 डिसेंबर 2021 पर्यंत. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे - 5 जानेवारी 2022.
या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे नमुना-6, नमुना-7, नमुना-8, व नमुना-8अ चे अर्ज उपलब्ध होतील. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणारे सर्व नागरीक मतदार यादीत नवीन नांव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करु शकतील. दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना ७ मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ मध्ये अर्ज करता येईल. एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास त्याकरीता नमुना ८अ मध्ये अर्ज करता येईल. सांगली जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालये व २८२-सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण ११ मतदार मदत केंद्रे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदार मदत केंद्र स्थापन केले आहे. तसेच ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करु शकतो.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच लोकशाही सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वीप प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 515 शाळा व महाविद्यालयांत निवडणूक साक्षरता मंडळे, 635 चुनाव पाठशाळा, 104 मतदार जागरूकता मंडळे, 197 मतदार केंद्रस्तरीय जागरूकता मंचांची स्थापना करण्यात आली असून त्यांचे माध्यमातून मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून “उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.